आई आणि भावाने युवकाच्या अंगावर ओतले उकळते पाणी
मालवण पोलिसांनी दोघांना केली अटक ; न्यायालयाकडून जामीन मंजूर
मालवण : कौटुंबिक वादातून आई आणि लहान भावाने युवकाच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याची घटना मालवण तालुक्यातील घुमडे गावात घडली. या प्रकरणी गणेश सदानंद घुमडेकर (वय ३२) या युवकाच्या तक्रारीनंतर त्याची आई रत्नमाला सदानंद घुमडेकर (वय ५१) व लहान भाऊ निलेश सदानंद घुमडेकर (वय २९ रा. घुमडे) यांच्यावर आज अटकेची कारवाई करण्यात आली.
ही घटना २ नोव्हेंबरला घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित जखमी युवक गणेश याच्या जबाबानंतर भाऊ निलेश व आई रत्नमाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी मालवण पोलिसांनी दोघांनाही अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी दिली. संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले.