आगामी निवडणूकीत कुडाळ, मालवण तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच किंगमेकर राहणार !
नवनियुक्त जिल्हा निरीक्षक विनायक देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक
विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर यांनी बैठकीत व्यक्त केला विश्वास
कुणाल मांजरेकर
मालवण : राष्ट्रीय काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षकपदी विनायक देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. श्री. देशमुख यांनी कुडाळ एमआयडीसी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते तसेच कुडाळ, मालवण विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर यांनी आगामी मालवण नगरपरिषद व कुडाळ नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसबाबत केलेल्या चाचपणीविषयी देशमुख यांचे लक्ष वेधत या निवडणुकांमध्ये काँग्रेसच किंगमेकर राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
निरीक्षक विनायक देशमुख यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक कुडाळ विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी येथील शासकीय निवासस्थान येथे घेतली. बैठकीला जिल्ह्यातील अनेक युवा आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अरविंद मोंडकर यांनी श्री. देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. येणाऱ्या मालवण नगरपरिषद व कुडाळ नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्याची ग्वाही मोंडकर यांनी श्री. देशमुख यांना दिली. गेल्या वेळी दोन्ही ठिकाणी काँग्रेस सदस्यांची झालेली निवड पाहता पुन्हा त्या त्या वार्डात मतदारांचा कौल पुन्हा काँग्रेसलाच मिळणार असल्याची चाचपणी केली आहे. त्यानुसार मालवण व कुडाळ मधील विविध गावात, वाडीत आणि बाजारपेठेतील जनतेमध्ये जाऊन केंद्रसरकारच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी जनजागरण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मोंडकर यांनी सांगितले. यावेळी देशमुख यांनी काँग्रेस मधील आपल्या कामाचा अनुभव युवा कार्यकर्त्यांसमोर मांडला. त्याच प्रमाणे या ठिकाणच्या महिलांना देखील सक्षम करण्यासाठी मंत्री. यशोमतीताई ठाकूर यांचा दौरा लवकरच आयोजित करू, असे सांगितले.