आ. नितेश राणे आक्रमक ; त्यावेळी पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता ?
मुंबईतील पत्रकार परिषदेत सवाल ; रझा अकादमीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी
यापुढे हिंदूंवर हल्ले झाले तर त्याला योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचाही इशारा
मुंबई : राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा, अशा मागण्या भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे यावेळी उपस्थित होते. रझा अकादमीचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर अफवा पसरवीत असताना पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता , रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी का दिली अशी प्रश्नांची सरबत्तीही आ. राणे यांनी केली. आ. राणे म्हणाले की, रझा अकादमीच्या समर्थकांनी त्रिपुरात धार्मिक स्थळांची तोडफोड झाल्याची खोटी माहिती समाज माध्यमांवर पसरवून मुस्लीम धर्मियांची माथी भडकविली. १२ नोव्हेंबर रोजी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या भित्तिपत्रकातून हिंसाचार घडविण्यासाठी चिथावले गेले. एवढे सगळे घडत असतानाही राज्याच्या पोलिसांनी रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी दिली गेली. या मोर्चात सहभागी झालेल्या मंडळींनी काही कारण नसतांना हिंदू धर्मियांवर हल्ले चढविले , पोलिसांवरही दगडफेक केली. मात्र पोलिसांनी हिंसक जमावाला बळाचा वापर करून रोखले नाही. आता राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील आणि महाविकास आघाडीचे काही नेते या हिंसाचाराबद्दल हिंदुत्ववादी संघटनांना दोष देत आहेत, हे धक्कादायक आहे. झालेल्या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी आ. राणे यांनी केली. यापुढे हिंदूंवर हल्ले झाले तर त्याला योग्य पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, अशा वेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला.
२०१२ मध्ये मुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चात झालेला हिंसाचार, भिवंडीत या संघटनेच्या जमावाने पोलीस स्थानकावर हल्ला चढवून दोन पोलिसांची केलेली हत्या या घटनांचेही आ. राणे यांनी यावेळी स्मरण करून दिले. शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी रझा अकादमीच्या व्यासपीठावर जाऊन केलेल्या भाषणाची चित्रफीत ऐकवत याबद्दल खोतकर यांना का अटक केली नाही असा सवालही आ. राणे यांनी केला आहे.