मालवण तालुक्यातील “त्या” धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांचा प्रश्न मार्गी ; आ. वैभव नाईक यांची माहिती
पुणे येथील सीडब्ल्यूपीआरएस. कडे मालवणातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे १२ लाख चाचणी शुल्क भरणा
टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा ; लवकरच निविदा प्रक्रिया होणार
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुक्यातील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची अनेक कामे आमदार वैभव नाईक यांनी बजेट मध्ये मंजूर करून घेतली आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यता देखील मिळाली असून सीआरझेड मुळे हे बंधारे प्रलंबित होते. आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे बंधाऱ्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य पतन विभागाकडून सर्व्हे करण्यासाठीचे १२ लाख ०२ हजार ४२० रुपये चाचणी शुल्क सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन पुणे (CWPRS) यांना भरण्यात आले आहे. त्यामुळे आता बंधाऱ्यांच्या कामांना तांत्रिक मंजुरी व टेंडर प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामध्ये मालवण तालुक्यातील देवबाग येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे ४ कोटी, मेढा राजकोट येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे २ कोटी, तळाशील समुद्र किनारी श्री. सावळाराम धाकू चोडणेकर यांच्या घरापासून ते राजन चंद्रकांत कोचरेकर यांचे घरापर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे ३ कोटी, दांडी मोरेश्वर रांज येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे २ कोटी, तळाशील समुद्र किनारी राजन चंद्रकांत कोचरेकर यांच्या घरासमोर धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे १ कोटी ५० लाख, हडी पाणखोल जुवा येथे संरक्षण बंधारा बांधणे २ कोटी, मसुरकर जुवा येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे ३ कोटी ४८ लाख या कामांचा समावेश आहे. लवकरच या कामांची निविदा प्राक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.