जागतिक मधुमेह दिनानिमित्त पोलीस, महसूल कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा उपक्रम ; ५० जणांची तपासणी
मालवण : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मालवण यांच्या वतीने सोमवारी मालवण पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालय येथील अधिकारी, कर्मचारी अशा सुमारे ५० जणांची मधुमेह, हृदयरोग व रक्तदाब तपासणी मालवण पोलीस ठाणे येथे करण्यात आली.
डॉ विवेक रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ कर्मचाऱ्यांच्या वतीने ही तपासणी करण्यात आली. यावेळी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर हेही उपस्थित होते. कोविड कालावधीत पोलीस, महसूल प्रशासनने सातत्याने कार्यरत राहून तणावपूर्ण वातावरणात सेवा बजावली. काही कर्मचारी कोरोना बाधित झाले. कोरोनावर मात करून पुन्हा हे सेवेत रुजू झाले. एकूणच जनतेसाठी झोकून देऊन काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक भावनेतून मोफत स्वरूपातील हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्याचे रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी सांगितले.