पालकमंत्री उदय सामंत यांना “ते” वक्तव्य भोवणार ?

न्यायालयीन तक्रार दाखल करण्याबाबत पडताळणी सुरू !

कुणाल मांजरेकर

आगामी निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जो सरपंच शिवसेनेत प्रवेश करेल त्याला १५ लाख निधी, पंचायत समिती सदस्य प्रवेश करेल त्याला २५ लाख निधी देऊ, तर जो जिल्हा परिषद सदस्य प्रवेश करेल त्याला ५० लाखाचा निधी देऊ, अशी ऑफर दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. शासनाचा पैसा हा पर्यायाने जनतेचा पैसा आहे, विकासाच्या हक्काचा निधी आहे. त्यावर पक्षीय राजकारणाच्या पोळ्या शेकून घेण्याची प्रवृत्ती अतिशय दुर्दैवी आहे. जनतेच्या पैशावर कोणीही राजकीय घोडेबाजार मांडू नये. हा शासकीय विकासनिधी आहे. या वक्तव्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी मनाची नसेल तर जनाची तरी लाज बाळगत दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा या प्रकाराबाबत न्यायालयीन तक्रार दाखल करावी लागेल, असा इशारा कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे. योग्य कायदेशीर माहिती घेत पालकमंत्र्यांना लवकरच नोटीस देण्यात येणार असल्याचे श्री. पराडकर यांनी स्पष्ट केले आहे.

दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना मेळाव्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की उद्यापासून मोहिम सुरू करा आणि जी अतिप्रिय लोकं दुसरीकडे आहेत, त्यांना शिवसेनेत आणा आणि यासाठी जिल्हा नियोजनचा निधी वापरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनतेच्या विकासासाठी योग्य पद्धतीने सर्व मतदारसंघात निधी वाटप होणे गरजेचे असताना उघडपणे असे वक्तव्य करणे हा केवळ राजकीय उन्माद नव्हे तर जनतेच्या हक्काचा अवमान देखील आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जनभावनेची कदर राखत वेळीच दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करू, असा इशारा कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांनी दिला आहे.

अविनाश पराडकर, अध्यक्ष, कमळ प्रतिष्ठान
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!