सावंतवाडी दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश ; आरोपी गजाआड !

दागिन्यांच्या हव्यासापोटी विनायक टंकसाळीने केल्या हत्या ; भीतीपोटी केले होते विष प्राशन

सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने ठाणे येथून आरोपीला घेतले ताब्यात ; आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

सावंतवाडी : सावंतवाडी मधील दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कुशल उर्फ विनायक नागेश टंकसाळी (वय- ३२, रा. उभाबाजार, सावंतवाडी) या तरुणाने दागिन्यांच्या हव्यासापोटी हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपीला मोबाईल लोकेशनच्या आधारे ठाणे येथून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला सावंतवाडीत आणण्यात आले असून आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि वितळवून घेतलेले दागिने देखील पोलिसांना सुपूर्द केले आहेत. खुनात सहभागी असल्यानेच या युवकाने विष पिऊन आत्महत्येचा तसेच दोनवेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, सहा. पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांचे विशेष अभिनंदन केले.


सावंतवाडी उभाबाजार येथील नीलिमा खानविलकर व शालिनी सावंत यांचा गळ्यावर वार करून निर्घूण खून करण्यात आल्याचा प्रकार ३१ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणात खून झालेल्या दोन्हीही कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात आली तर खून झालेल्या कालावधीत त्या परिसरात कोण कोण वावरत होते, खून झालेल्या घरात कोण कोण जाऊन आले त्यांची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली होती. तसेच त्या दोघांनाही पोचवले जाणार्‍या जेवणाच्या डब्याचा वेळ याची देखील पोलिसांनी माहिती मिळवली. या प्रकरणी तपासाबाबत पोलिसांकडून गुप्तता बाळगली जात होती. खुनाच्या तपासासाठी अनेक जणांची चौकशी सुरू असतानाच चौकशीसाठी बोलावलेल्या एका युवकाने चौकशीच्या ससेमिर्‍याच्या भितीने बेपत्ता होत विषप्राशन केले होते. त्यावेळी त्याच्या पत्नीने दिलेल्या बेपत्ताच्या तक्रारीनंतर पोलीसांनी त्याला वेंगुर्ला येथून ताब्यात घेतले होते. मात्र, विष प्राशन केल्याने अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून डॉक्टरच्या सल्ल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते. मात्र, ९ नोव्हेंबर रोजी उशिरा तो पुन्हा नाट्यमयरित्या बेपत्ता झाला. त्यामुळे संशयाची सुई त्या युवकाकडे वळली. या युवकाचे प्रथम लोकेशन हे आंबोली – पारपोली भागात आढळून आले होते. ज्या परिसरात लोकेशन आढळले, त्या ठिकाणी पोलिसांनी जात तपास देखील केला. तर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, त्याचा काही सुगावा लागला नाही. त्यानंतर त्याचे मोबाईल लोकेशन ठाणे परिसरात आढळून येताच पोलिसांनी मुंबई गाठत त्याचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेत सकाळी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरा पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

सावंतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हयाचे गांभिर्य ओळखून पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार याची वेगवेगळी पथके तयार करण्याचे आदेश देवून गुन्हयाचा तपास शिघ्रगतीने करण्याचे आदेश दिले. सदर पथकांचा तपास अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या देखरेखीखाली सुरु होता. गुन्ह्याच्या तपासामध्ये सुमारे ४० साक्षीदाराकडे चौकशी करण्यात आली. तसेच घटनास्थळ व आजुबाजुचा परिसर पोलीस पथक, डॉग स्काड, इन्हेस्टीगेशन व्हॅन यांच्या मार्फतीने पिंजून काढण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या सखोल तपासामध्ये संशयीत इसमास मानखुर्द, मुंबई येथून सावंतवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. तौसिफ सय्यद व पथकाने चौकशीकरीता ताब्यात घेवून सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले. त्याच्याकडे करण्यात आलेल्या सखोल चौकशीमध्ये त्याने मयत महिला निलीमा खानविलकर यांच्या गळयामध्ये असलेल्या सोन्याच्या चेनकरीता निलीमा खानविलकर व त्यांच्या केअर टेकर शालिनी सावंत यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलीसांच्या तपासामध्ये त्याने खुन करण्याकरीता वापरलेला चाकू व वितळविलेले सोने काढुन दिले. या गुन्हयाच्या तपासामध्ये पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या देखरेखीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, सायबर विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, स्था. गु. शाखाचे पो.उ.नि. सचिन शेळके, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. जयराम पाटील, स्था.गु.शाखेचे पो.ह. सुधिर सावंत, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रविण वालावलकर, आशिष गंगावणे, गुरुनाथ कोयंडे, पो.शि. प्रथमेश गावडे, अमित पालकर, जयेश सरमळकर, संदिप नार्वेकर, यशवंत आरमारकर, अमित तेली तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पो.ह. प्रसाद कदम, पोहवा मुकुंद सावंत, पोहवा सतिश कविटकर, पो.ना. अमित राउळ, पो.शि. रामचंद्र साटेलकर, निलेश सावंत, भुषण भोवर, मनिष शिंदे यांनी सहभाग घेतला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!