चिवल्यात रापणीच्या जाळ्यात चक्क “डॉल्फिन”
जाळ्यातून ओढून आलेल्या डॉल्फिनना रापण संघाकडून जीवदान
न्यू रापण संघ रेवतळेने दाखवलेल्या सामाजिक भानाचं होतंय कौतुक
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण शहरातील चिवला बीच समुद्रकिनारी नेहमीच डॉल्फिन माशांचे थवेच्या थवे दिसून येतात. त्यामुळे चिवला बीचचा सागर किनारा डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी पारंपरिक मच्छिमारांनी लावलेल्या रापणीत चक्क डॉल्फिन मासे आढळून आले. जवळपास १५ हून अधिक डॉल्फिन मासे रापणीच्या जाळ्यात अडकल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास आल्यानंतर या सर्व डॉल्फिनना तात्काळ समुद्रात सोडून देण्यात आले. हे डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांनीही गर्दी केली होती.
मालवण शहरातील चिवला बीचला पर्यटक मोठ्या संख्येने पसंती देतात. या ठिकाणी डॉल्फिन मासे मोठ्या संख्येने दिसून येत असून पहाटेच्या वेळी या डॉल्फिनचे दर्शन हमखास मिळते. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रेवतळे येथील न्यू रापण संघाने नेहमीप्रमाणे या ठिकाणी रापणीची जाळी ओढली होती. यानंतर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रापण संघातील मच्छिमारांनी ही जाळी ओढली असता जाळ्यात सुमारे १५ हून अधिक डॉल्फिन मासे अडकून असल्याचे यांच्या निदर्शनास आले. हे पाहताच मच्छिमारांनी या डॉल्फिनना तात्काळ समुद्रात सोडले. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनीही मोठी गर्दी केली होती. या मच्छीमारांमध्ये सुभाष मिठबावकर, जॅकी गिरकर, विजय फाटक, ईनास डिसोजा, अमय मांजरेकर, मंगेश वेंगुर्लेकर, अशोक पेडणेकर, महेश हडकर, बाबू मेंडीस, कर्नल फर्नांडिस, बाबत डिसोझा, जोसेफ फर्नांडिस यांचा समावेश होता. डॉल्फिन हा संरक्षित मासा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मच्छीमारांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.