संपामुळे एसटीला दररोज १५ ते २० कोटी तोटा !

महामंडळाने कर्मचाऱ्यांना केलं “हे” आवाहन

कुणाल मांजरेकर

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यभरात लालपरी ठप्प झाली असून प्रवासी वर्गाचेही हाल सुरू आहेत. राज्य शासनाने हा संप मागे घेण्याचे आवाहन केले असून कर्मचारी संघटना विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एका पत्रकातून कर्मचारी वर्गाला भावनिक आवाहन केलं आहे. आज एसटी महामंडळाचा संचित तोटा १२,००० कोटी पर्यंत पोहोचला आहे. या संपामुळे दररोज १५ ते २० कोटींचा तोटा होत असून आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीला संप करून पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा दिवसेंदिवस जटिल बनला असून हा संप मोडून काढण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आक्रमक बनली आहे. तर विरोधी पक्षाने या संपाला पाठिंबा देत कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेऊ नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे संप मागे घेण्यासाठी राज्य सरकार न्यायालयात गेले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ट्विटर वरून कर्मचाऱ्यांना भावनिक साद घालत संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

पाहुयात, नेमकं काय आवाहन केलंय एसटी महामंडळाने

कर्मचारी बंधु भगिनींनो…
नम्र आवाहन
कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठया आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा १२००० कोटी रुपया पर्यंत पोहचलेला आहे. असे असतांना देखील, सर्व कर्मचा-यांचे गेल्या १८ महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे. अर्थात, त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यत ३५४९ कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे. यापुढे देखील आपल्या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.
कर्मचारी बांधवांनो… आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (२८ टक्के ) व घरभाडे भत्ता (८,१६, २४ टक्के ) मान्य केल्या आहे. तसेच दिवाळी भेट ही दिली आहे. असे असुन देखील अचानकपणे पुढे आलेल्या ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे, त्या मागणीबाबत एसटी महामंडळ आणि राज्य शासन मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे प्रामाणिकपणे अनुपालन करित आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने आपले कार्य सुरु केले आहे.
बंधु भगिनींनो… आपण संप मागे घ्यावा यासाठी मा. मुख्यमंत्री महोदय यांनी सुध्दा विनंती केली आहे. आपल्या संपामुळे महामंडळाला दररोज १५ ते २० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. अर्थात, संपाचा विपरीत आर्थिक परिणाम संस्था आणि संस्थेचे कर्मचारी म्हणुन आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. संपामुळे गेली कित्येक दिवस सर्व सामान्य प्रवाशी जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या सर्वांचा विचार करुन आपण तातडीने संप मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा रुजु व्हावे हीच आपणांस विनंती.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!