… तर मनसे रस्त्यावर उतरणार : परशुराम उपरकर यांचा खासगी वाहतूकदारांना इशारा !

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न राजसाहेबांच्या कोर्टात ; लवकरच तोडगा निघण्याचा विश्वास केला व्यक्त

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मालवणात घेतली एसटी कर्मचाऱ्यांची भेट

कुणाल मांजरेकर

मालवण : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने खासगी वाहतूकदारांना बसस्थानकांवरून सेवा देण्यास परवानगी दिली आहे. मात्र येथील खाजगी वाहतूकदारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. परंतु, भविष्यात कोणाही खाजगी वाहतूकदाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जाऊन राज्य शासनाला सहकार्य केल्यास मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न घेऊन संघटनेचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. राजसाहेबांनी स्वतः यामध्ये लक्ष घातला असून ज्या विषयात राजसाहेब लक्ष घालतात, तो विषय लवकर मार्गी लागतो, हा इतिहास आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतही सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास श्री. उपरकर यांनी व्यक्त केला.

परशुराम उपरकर यांनी गुरुवारी दुपारी मालवण एसटी आगारात संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, शैलेश अंधारी, विशाल ओटवणेकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, एसटीचे कर्मचारी १४ दिवस संपावर आहेत. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा लक्ष देण्यास सरकार तयार नाही. विदर्भ-मराठवाड्यात आतापर्यंत ३६ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंब प्रमुखाच्या चिंतेमुळे काही ठिकाणी त्यांची कुटुंबे आंदोलनात उतरली आहेत. सिंधुदुर्गात देखील एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून प्रवासी वर्गाचे अत्यंत हाल होत आहेत. तरीदेखील शासन या संपकरी कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाही. सत्तेत येण्यापूर्वी या सरकारने आपण कुणालाही आंदोलन करायला देणार नाही, सर्वांना न्याय देऊ अशी ग्वाही दिली होती. मात्र १४ दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाही या आंदोलनाकडे पाहण्यास सरकारला वेळ नाही. काही विभागांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र शब्दात निषेध करत आहे. या ठिकाणी खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे, याचे आम्ही स्वागत करतो. मात्र भविष्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी खाजगी चालकांनी सरकारला मदत केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मनसे उभी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एसटी कर्मचारी संघटनेने भेट घेतली असून राज साहेबांनी स्वतः हा विषय हाती घेतला आहे. त्यामुळे लवकरच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत तोडगा निघेल, असे परशुराम उपरकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!