कुडाळ- मालवणच्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना “बंपर ऑफर” ?
तारकर्ली, देवबाग नंतर आता कुडाळ-मालवण रस्त्यावर लागले बॅनर
कुणाल मांजरेकर
मालवण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी रस्त्यांची दैनावस्था झाली असून मालवण आणि कुडाळ तालुक्यांना जोडणाऱ्या चौके नेरूरपार मार्गे कुडाळ रस्त्याची तर बिकट अवस्था झाली आहे. अलीकडेच वायरी, तारकर्ली, देवबागच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बॅनरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला होता. आता हेच लोण चौके नेरूरपार मार्गे कुडाळ रस्त्यावर पसरले आहे. याठिकाणी संतप्त नागरिकांनी बॅनर लावून सत्ताधाऱ्यां बाबतची नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी कांदळगाव मधील खड्डेमय रस्त्यावरून या ठिकाणी बॅनर लावून अज्ञातांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. हे बॅनर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर वायरी, तारकर्ली, देवबाग, देवली या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात बॅनर लावून खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यात आले होते. तरीदेखील अद्यापही येथील रस्त्यांची परिस्थिती नादुरुस्त आहे. मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून तारकर्ली, देवबाग रस्त्यावरून प्रवास करताना पर्यटकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कुडाळ मालवण हा रस्ता वर्दळीचा प्रमुख रस्ता मानला जातो. दर दिवशी या रस्त्यावरून शेकडोंच्या संख्येने वाहने ये-जा करतात. मात्र या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी आता या रस्त्यांवर देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे.
काय म्हटलंय बॅनरमधून … कोणता लगावलाय टोला ?
“तुम्हाला निवडून देऊनि आम्ही हात जोडीले, ह्या रस्त्यावर प्रवास करताना आमचे कंबरडे मोडीले”,
“शिवी न घालता मालवण कुडाळ प्रवास करा आणि मिळवा बंपर ऑफर”,
“पहिलं वैभव कणकवलीत होतं आता तेच वैभव खड्ड्याच्या रूपाने मालवण -कुडाळ रस्त्यावर दिसतंय”,
“मालवण नेरूरपार कुडाळ रस्त्याने खड्ड्यातून जाऊ, पुन्हा तुम्हाला निवडून देऊ”
अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.