रामेश्वर – नारायणाचा पालखी सोहळा अपूर्व उत्साहात ; बाजारपेठेवर मात्र मंदीचे सावट

पालखीच्या शहर परिक्रमेत पावसाचा व्यत्यय ; मात्र भाविकांचा उत्साह कायम

चायनीज, पंजाबी हॉटेल व्यवसाय समाधानकारक ; आईस्क्रीम, कापड- भांडी व्यावसायिकांना मंदीचा फटका

कुणाल मांजरेकर

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाचा पालखी सोहळा शुक्रवारी अपूर्व उत्साहात पार पडला. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे पालखी सोहळ्यावर मर्यादा होत्या. मात्र यंदा कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने भाविक उत्साहात या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. मात्र दुपार पासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पालखीच्या शहर परिक्रमेत काही ठिकाणी व्यत्यय आला. मात्र तरीही भाविकांचा उत्साह कमी झाला नव्हता. दरम्यान, पालखी सोहळा उत्साहात पार पडला असला तरी बाजारपेठेवर मात्र आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळाले. भाऊबीजेच्या निमित्ताने कापड आणि भांड्याच्या दुकानात नेहमी होणारी गर्दी यंदा पाहायला मिळाली नाही. आईस्क्रीम – कोल्ड्रिंक्सच्या दुकानातही ग्राहकांचा अभाव जाणवून आला. परंतु, पंजाबी, चायनीज हॉटेल व्यवसायिकांकडे मात्र समाधानकारक उलाढाल दिसून आली.

ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाच्या पालखी सोहळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. दिवाळीत बलीप्रतिपदेच्या दिवशी श्री देव रामेश्वर नारायणाची पालखी मंदिरातून आपल्या लव्याजम्यासह बाहेर पडून शहर परिक्रमेला निघते. या दिवशी शहर आणि परिसरात उत्साहाचे वातावरण पहायला मिळते. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होत असल्याने व्यापारीदृष्ट्या देखील या पालखी सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मागीलवर्षी कोरोनाच्या सावटामुळे पालखी सोहळ्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. मागील वर्षी रामेश्वर नारायणाची पालखी बाजारपेठेतून लवकर निघाल्याने आर्थिक उलाढाल देखील कमी प्रमाणात झाली होती. मात्र यंदा कोरोनाचे संकट बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने हा पालखी सोहळा उत्साहपूर्वक वातावरणात सुरू झाला.

राजेश पारधी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही रामेश्वराची पालखी आकर्षकरित्या सजवून रामेश्वराची सेवा केली.

असा झाला पालखीचा प्रवास !

   दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देऊळवाडा येथील रामेश्वर नारायणाच्या मंदिरातून ही पालखी आपल्या लवाजम्यासह शहर परिक्रमेला बाहेर पडली. या पालखीसोबत भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अडीच वाजण्याच्या सुमारास रामेश्वर नारायणाची पालखी भूतनाथ मंदिराकडे दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. यामुळे काहीकाळ ही पालखी भूतनाथ मंदिरात थांबवून ठेवण्यात आली होती. काही वेळाने पाऊस ओसरताच पुन्हा एकदा त्याचउत्साहात ही पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. येथून वायरी मोरयाचा धोंडा येथे पालखीचे  आगमन झाले. तर येथून दांडी येथील दांडेश्वर मंदिरात पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. मेढा येथील काळबादेवी मंदिरात पालखी पोहोचताच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने येथे काही काळ पालखी थांबवून ठेवण्यात आली होती. पाऊस कमी झाल्यानंतर बाजारपेठेतील रामेश्वर मांडावर पालखी आणण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. रामेश्वर मांड मित्रमंडळाच्या वतीने येथे पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. रात्री ८  वाजेपर्यंत ही पालखी रामेश्वर मांडावर दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यानंतर भरडनाका मार्गे पालखी देऊळवाड्याच्या दिशेने रवाना झाली. या मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. भरडनाका येथे सन्मित्र रिक्षाचालक-मालक मित्र मंडळाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.

हाच तर रामेश्वराचा महिमा !

मालवण शहरातील रामेश्वर – नारायणाचं देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. यंदा पालखी सोहळ्याच्या आदल्या रात्री लक्ष्मीपूजनाला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पालखी सोहळ्यावर पावसाचे संकट निर्माण झाले. पालखी सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी पाऊस कोसळला. मात्र प्रत्येक वेळी पालखी कोणत्या ना कोणत्या मंदिरात स्थानापन्न झाली होती. पहिल्या वेळी पाऊस सुरू झाला तेव्हा पालखी भूतनाथ मंदिरात, दुसऱ्यावेळी काळबादेवी मंदिरात तर तिसऱ्यावेळी बाजारपेठेतील रामेश्वर मांडावर स्थानापन्न झाली होती. शुक्रवारी मालवणात जोरदार पाऊस झाला. मात्र पालखीची वाटेत कुठेही अडवणूक झाली नाही. हाच तर माझ्या रामेश्वराचा महिमा अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

बाजारपेठेत मंदी ; पावसाने उडवली दैना !

मालवणचा पालखी उत्सव म्हटला की येथील बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होते. परंतु यंदा बाजारपेठेत आर्थिक मंदीचे चित्र पहायला मिळाले. मागील वर्षी कोरोनामुळे बाजारावर आर्थिक मंदी राहिली. यंदा कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने व्यापार सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यापारी ठेवून होते. मात्र यंदाही आर्थिक मंदीचेच चित्र पाहायला मिळाले. पालखीच्या पूर्वसंध्येला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळ नंतर पावसाने जोर धरल्याने ग्राहकांनी बाजारात येण्याचे टाळले. तर पालखी उत्सवा दिवशी दुपारपासून पावसाने जोर धरल्याने बाजारात नागरिकांची वर्दळ कमी प्रमाणात जाणवली. याचा फटका प्रामुख्याने आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स व्यवसायाला बसला. तसेच भाऊबीजेनिमित्ताने कापड आणि भांड्यांच्या दुकानात गर्दी पाहायला मिळते. मात्र ही दुकाने देखील बऱ्यापैकी रिकामी होती. मालवणी जेवणाच्या हॉटेल्समध्येही ग्राहकांचा शुकशुकाट जाणवून आला. पालखी दिवशी अनेक छोटे मोठे विक्रेते रस्त्यावर दुकाने थाटतात. मात्र ही दुकाने देखील पावसामुळे लागू शकली नाहीत. या एका दिवसावर अनेकांचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र हे गणितच कोलमडले. त्यामुळे आर्थिक मंदी आणि पाऊस यांमुळे व्यापारी दृष्टीने ही दिवाळी आणि पाडवा फारसा समाधानकारक गेला नाही.

एकता मित्रमंडळ, सुमुख आर्ट्स यांनी वाढवली पालखीची शोभा

एकता मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून आकर्षक कंदील तयार केले जातात. यंदाही श्री देव रामेश्वर नारायण पालखी सोहळ्यानिमित्त आकर्षक कंदील तयार करून एकता मित्रमंडळाने पालखीची शोभा वाढवली. यासाठी एकता मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली होती. तर सुमुख आर्ट यांनी रामेश्वराच्या नावाची आख्यायिका सांगणारा चलचित्र देखावा तयार केला होता.

आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी घेतले पालखीचे दर्शन

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मोरयाचा धोंडा याठिकाणी श्री देव रामेश्वर नारायणाच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, बाबी जोगी, सेजल परब, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर, तृप्ती मयेकर, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, पंकज सादये, प्रवीण लुडबे, प्रवीण रेवंडकर, यशवंत गावकर आदी उपस्थित होते. तर मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वायरी येथील भूतनाथ मंदिरात पालखीचे दर्शन घेतले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!