Exclusive : मालवणचे रस्ते “ओव्हर फ्लो” ; सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा !
वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक ; अधिकारी स्वतः मैदानात
कुणाल मांजरेकर
दिवाळीनिमित्त लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मालवण शहरातील सर्वच रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी ओव्हरफ्लो झाले आहेत. शहरातील सर्वच रस्त्यांवर दिवसभर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून सायंकाळ नंतर तर सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याचे दिसून आल्या. येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना पोलिसांचीही चांगलीच भंबेरी उडाली होती. वाहतूक नियंत्रणासाठी अधिकारी देखील रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले.
मालवण शहरात सध्या पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. अनेक पर्यटक निवासस्थाने कोरोना नंतर अद्याप सुरू न झाल्याने उपलब्ध असलेल्या होम स्टे वर अतिरिक्त ताण येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालवणात पर्यटनासाठी दाखल होणाऱ्या पर्यटकांना निवासासाठी अन्य ठिकाणचा आसरा शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. सायंकाळनंतर मालवण शहरातील सर्वच रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी हाऊसफुल झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. भरड ते तारकर्ली रस्त्यावर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर भरड ते कसाल रस्त्यावर देऊळवाडयाच्या पुढेपर्यंत रांगा लागल्या होत्या. बाजारपेठ सह अन्य रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जातीनिशी उपस्थित होते. मात्र वाहतुकीचे नियोजन करताना या सर्वांची दमछाक होत होती.