मालवणात “कोसळधार” ! लक्ष्मीपूजनाच्या उत्सवावर पावसाचे संकट

ढगांच्या प्रचंड गडगडाट ; शहराचा वीज पुरवठाही काही काळ ठप्प

भाविकांना उद्याच्या पालखी सोहळ्याची चिंता ; व्यापारी वर्गही चिंतेत

कुणाल मांजरेकर

ऐन दिवाळीत गुरुवारी सायंकाळी मुसळधार पावसाने मालवणला झोडपून काढले. ढगांचा प्रचंड गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह कोसळलेल्या पावसामुळे लक्ष्मीपूजनाच्या उत्साहावर संकट निर्माण झाले. दरम्यान, मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाचा ऐतिहासिक पालखी सोहळा शुक्रवारी संपन्न होत आहे. रामेश्वराची पालखी आपल्या लवाजम्यासह नगर प्रदक्षिणा करणार असून मुसळधार या पालखी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भविकांसह व्यापारी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे.

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर- नारायणाचा पालखी सोहळा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीचे प्रमुख आकर्षण समजले जाते. या पालखी सोहळ्याच्या एका दिवसात मालवणच्या बाजारपेठेत लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. काही वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत रामेश्वराच्या पालखी सोहळ्यावेळी अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेची दैनावस्था उडवली होती. त्यावेळी अनेक व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. त्या आठवणी आजही त्या व्यापाऱ्यांच्या मनात ताज्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस मालवणात पाऊस सुरू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने जोर धरला. ढगांचा प्रचंड गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे शहरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. शुक्रवारी मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा संपन्न होत आहे. त्यामुळे पावसाचे विघ्न दूर होवो, अशी प्रार्थना भविकांतून रामेश्वर चरणी केली जात आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!