झाराप मस्जिद मोहल्ला येथे उबाठाला धक्का ; संपूर्ण वाडीचा शिवसेनेत प्रवेश
महायुतीचे नेते खा. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून प्रवेश
विरोधक केवळ टीका करण्याचे काम करतात, गावागावात सुबत्ता आणण्यासाठी आमचे प्रयत्न : खा. नारायण राणे
गावातून ९० टक्के पेक्षा जास्त मतदान द्या, तीन महिन्यात रस्ते विकासाचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही : दत्ता सामंत यांचा शब्द
कुडाळ | कुणाल मांजरेकर
मागील अनेक वर्षे उद्धव ठाकरे शिवसेनेला एक गठ्ठा मतदान करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील झाराप मस्जिद मोहल्ला खान मोहल्ला येथील ग्रामस्थांनी सोमवारी महायुतीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुढाकार घेतला. मागील काही वर्षे येथील विद्यमान आमदार वैभव नाईक आणी माजी खासदार विनायक राणे यांना एक गठ्ठा मतदान देऊनही महामार्गाला लागून असलेले आमचे गाव रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत गावचा विकास हा दृष्टीकोन ठेवून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पाठीशी राहणार असल्याचा शब्द ग्रामस्थांनी दिला.
झाराप मुस्लिम मोहल्ला खान मोहल्ला येथील विकासात्मक प्रश्नांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर येथील मुस्लिम बांधव आणी भगिनींनी महायुतीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. यानुसार सोमवारी खा. नारायण राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, रूपेश पावसकर, विनायक राणे, बंड्या मांडकुलकर, दिनेश साळगावकर, राजू राऊळ, रुपेश कानडे, सरपंच दक्षता मेस्त्री, विश्वास गावकर, प्रदीप तेंडोलकर, अनिकेत तेंडोलकर, रत्नाकर जोशी, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दीपक नारकर, मोहन सावंत, सीताराम तेली, किसन मांजरेकर, पप्पू मुजावर, वहाब डिचोलकर, रफिक शेख यांच्यासह भाजपा शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी येथील ग्रामस्थ तबरेज आजगावकर, गनी आजगावकर, शब्बीर आजगावकर, सलीम आजगावकर, शहाबाज आजगावकर, मुन्ना जद्दी, फिरोज जद्दी, वासीम जद्दी, गफार शेख, जावेद शेख, रफिक शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ रफिक शेख म्हणाले, गेली ५० वर्षे रस्त्या ची रस्त्याची सोय नव्हती. रस्ता न होण्याला आम्हीच जबाबदार. एका निष्क्रिय आमदार, खासदाराला आम्ही निवडून दिले. त्या उलट राणे कुटुंब स्वतःच्या खिशातून हात घालून मदत करतात. त्यामुळे आता विकासाच्या प्रक्रियेत येण्यासाठी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटण दाबून त्यांना मतदान करून निवडून देऊया, असे सांगून आम्ही सर्व जण तुमच्या सोबत राहू. फक्त आमची विकास कामे मार्गी लावा, अशी मागणी शेख यांनी केली.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, झाराप मुस्लिम मोहल्ल्याचा रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबीत आहे. मात्र आमदार वैभव नाईक यांचे येथे दुर्लक्ष झाले. ही समस्या माझ्याकडे आल्यानंतर राणे साहेब, निलेश राणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज उबाठा वाले जाती जातीत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विकास कामे न करता तेढ निर्माण करून मते घ्यायची, आपला स्वार्थ साधायचा, हेच काम यांनी केले. 2014 पूर्वी राणेसाहेबांनी जे रस्ते केले त्याचे नूतनीकरण करायचे काम देखील या लोकांनी केले नाही, असे सांगून निलेश राणे 60 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मतदार संघातील अपूर्ण रस्ते पूर्ण करण्यासाठी निलेश राणे आणी मी वर्षाच्या बाराही महिने काम करू. हे काम केले नाही तर तुमचे मत मागायला यापुढे येणार नाही. एखाद्याचे काम करायचे असेल तर नुसती पत्र नाही वाटायची ही शिकवण राणे साहेबानी आम्हांला दिली आहे. झाराप गावातून 90 टक्के मतदान निलेश राणे यांना झाल्यास तुमच्या तिन्ही वाड्यांचे रस्ते चार महिन्यात डांबरीकरण केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले.
शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे म्हणाले, विरोधक नेहमी निलेश राणे यांच्याबाबत अफवा पसरवण्याचे काम करतात. पण एखादी व्यक्ती त्यांच्या जवळ गेल्यास त्यांचा स्वभाव पहिल्यावर ती त्यांच्या नक्कीच प्रेमात पडेल. या आठ दहा दिवसात मी त्यांच्या सोबत आहे. कार्यकर्त्याना कसं जपावं, ते निलेश राणे यांच्याकडून जपावं, असं सांगून ९० सालानंतर जिल्ह्याचा जो विकास झाला तो फक्त राणे साहेबांमुळे हे विरोधक देखील मान्य करतील. त्यामुळे राणे साहेब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा ही ओळख कायम ठेवली पाहिजे. राणे साहेबांना लोकसभेत २७ हजाराचे लीड दिले आहे. हे लीड दुप्पट करण्यासाठी प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी खा. नारायण राणे यांनी मागील 35 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करताना केलेल्या विकासाचा लेखाजोखा मांडला. मी काम करताना कधी जात पात धर्म बघितला नाही. माणुसकी हाच धर्म समजून काम केले. यापुढे दत्ता सामंत आणि पदाधिकारी जी कामे सांगतील ती अग्रक्रमाने पूर्ण केली जातील, असे सांगून गावागावात आर्थिक सुबत्ता नांदावी, चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी माझे प्रयत्न आहेत, असे खा. राणे म्हणाले. विरोधक केवळ टीका करण्याचे काम करतात, विकासाची कामे त्यांच्याकडून होत नाहीत. जी कामे मी करतो, तीच कामे निलेश करतो तो कुठेही कमी पडत नाही. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य हीच विकासाची कामे नाहीत, विकास व्हायचा असेल तर आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. त्यासाठी कारखानदारी आली पाहिजे. येथील मुले, मुली शिकल्यानंतर त्यांना इथेच नोकरी मिळायला पाहिजे. यासाठी माझे प्रयत्न आहेत. येणारी २० तारीख महत्वाची आहे. निलेशला विजयी करा. निलेश देखील तुमची मदत करेल. तुमचा रस्ता नक्की होईल. आम्ही एक पाऊल पुढे येतो आम्हाला प्रतिसाद द्या, असे आवाहन खा. नारायण राणे यांनी केले.
छायाचित्रे – समीर म्हाडगूत, मालवण