“त्या” खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नाही : निलेश राणेंचे स्पष्टीकरण 

माझ्या नावे कोणीही फोन किंवा पैशाची मागणी केल्यास नजिकचे पोलीस ठाणे किंवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार द्यावी

ज्यांचा व्यवसायच ठेकेदारी आहे त्यांनी माझ्यावर आरोप करण्याअगोदर कुठल्याही शासकीय कामात माझा संबंध आल्यास तो पुराव्यानिशी जाहीर करण्याचे आवाहन

मालवण : शिवसेना उबाठा गटाकडून काल माजी खासदार निलेश राणे यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आले आहे. यातून निलेश राणे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावर स्वतः निलेश राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “त्या” खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या नावे कोणीही फोन किंवा पैशाची मागणी केल्यास नजिकचे पोलीस ठाणे किंवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्याकडून काही रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आली यात शासकीय ठेकेदार व शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे माझ्याशी संबंधित व्यक्ती यांच संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सदरील खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नसून ठेकेदारी किंवा ठेकेदार या बाबतही माझा कुठे संबंध नाही. मी व्यक्तिगत ठेकेदारी करत नाही किंवा कुठल्याही ठेकेदारांशी कुठल्याही शासकीय कामात माझी भागीदारी नाही. आज पर्यंत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी कधीही कुठल्याही ठेकेदाराकडून अर्थसहाय्य किंवा वस्तूरुपात मदत मागत नाही, मदत घेत नाही किंवा त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाही करत नाही. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांना माझ्या नावावर कुणीही फोन करत असेल किंवा इतर आर्थिक मागणी करत असेल तर त्यांनी याची तक्रार जवळचे पोलीस स्टेशन अथवा जिल्हा पोलीस अधिक्षकांजवळ द्यावी, माझ्या नावाचा वापर करून कुणीही ठेकेदारांकडून किंवा इतर कुणाकडूनही रोख रक्कम अथवा इतर काही मागणी करत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पोलीस अधिक्षकांशीबोलून अश्या व्यक्तींवर कारवाईसाठी सूचित करेन. ज्यांचा व्यवसायच ठेकेदारी आहे त्यांनी अश्या प्रकारे माझ्यावर आरोप करण्याअगोदर कुठल्याही शासकीय कामात माझा संबंध आल्यास तो पुराव्यानिशी जाहीर करावा.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3797

Leave a Reply

error: Content is protected !!