शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या १३ नोव्हेंबरला टोपीवाला हायस्कुलच्या पटांगणावर जाहीर सभा
उद्याची प्रचाराची सभा विजयाची सभा ठरणार : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
येथील ठाकरे शिवसेनेच्या शाखेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कुडाळ मतदार संघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आज उत्साह निर्माण झालेला आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचा मान, सन्मान मिळवून देण्यासाठी जनता प्रयत्न करत आहे. ज्या वर्षा बंगल्यावरून ठाकरे यांना बाहेर पडावे लागले. त्याच वर्षा बंगल्यात त्यांना पुन्हा एकदा पाठविण्यासाठी शिवसेनेचा कार्यकर्ता सज्ज झाला आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी, सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि या मालवणच्या जनतेसमोर पुन्हा एकदा नतमस्तक होण्यासाठी उद्धव ठाकरे प्रचार सभेसाठी येथे येत आहेत. उद्धव ठाकरे येत असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. कोकणच्या जनतेला ज्या ज्या गरजा होत्या. त्या देण्याचे काम केले. शासकीय मेडिकल कॉलेज असेल. तोक्ते वादळाच्या काळात सुमारे ५४ कोटीहून अधिक रकमेची नुकसान भरपाई त्यांनी नुकसान ग्रस्तांना मिळवून दिली. यात मच्छीमार घटक, शेतकरी, ज्यांची घरे कोसळली होती. अशा प्रत्येक घटकाला मदत मिळवून देण्याचे काम श्री. ठाकरे यांनी केले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून वेळागर येथील ताज हॉटेल असेल, इसदा संस्थेला दिलेली बोट असेल, किल्ले सिंधुदुर्ग वरील एलईडी शो असेल. शहरात होणारे मत्स्यालय असेल या गोष्टी तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात रिसॉर्ट उभे करताना अनेक कायदे होते. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. परिणामी या कायद्यांमध्ये बदल घडविण्यासाठी, जाचक अटी शिथिल करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न केले. त्यामुळे केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्हे तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी जनता या सभेला येणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक या मतदार संघातून निश्चितच विजयी होतील असा विश्वास सर्वांना आहे. त्यामुळे ही प्रचारसभा विजयाची ठरेल असा विश्वास श्री. खोबरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.