“त्या” प्रश्नावरून अशोक सावंत आक्रमक ; खा. विनायक राऊतांवर साधला निशाणा
मालवण : तालुक्यातील बिळवस गावात बीएसएनएल टॉवर मंजूर होऊन आठ वर्षे झाली. खासदार विनायक राऊत यांनी नारळ फोडला. मात्र अद्यापपर्यंत इथला टॉवर बंदच आहे. यावरून भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांसमवेत त्यांनी थेट बीएसएनएलचे सावंतवाडी कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
खासदार विनायक राऊत यांनी फक्त नारळ फोडले. टॉवर मात्र बंदच आहेत. हे कधी कार्यान्वित करणार हे लेखी द्या अन्यथा इथून हलणार नाही असा इशारा यावेळी अशोक सावंत यांनी दिला. सावंत यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बीएसएनएल अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर पर्यंत टॉवर कार्यान्वित करण्याचे लेखी पत्रच सावंत यांना दिले.
मालवण तालुक्यातील बिळवस गावसह जिल्ह्यातील इतर बंद असलेल्या बीएसएनएल टॉवर प्रश्नी भाजपा नेते अशोक सावंत यांनी बीएसएनएलच्या सावंतवाडीतील जिल्हा कार्यालयाला धडक दिली. यावेळी बिळवस सरपंच मानसी पालव, विश्वास पालव, सीताराम सावंत, दीपक पालव, लक्ष्मण पालव, विभाकर पालव, रोशन पालव, सुहास माधव, संभाजी पालव, नितेश पालव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. बिळवस गावचा बीएसएनएल टॉवर मंजूर होऊन आठ वर्षे झाली. खासदार विनायक राऊत यांनी नारळ फोडून तीन वर्षे झाली. मात्र, टॉवर काही सुरू झाला नाही. टॉवर केव्हा सुरू करणार याचे लेखी पत्र द्या, तोपर्यंत इथून हलणार नाही. असा इशारा अशोक सावंत यांनी दिला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी थातुरमातुर उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावंत लेखी पत्रावर ठाम होते. लोकांना सेवा सेवा द्या अन्यथा दुकान बंद करा अशा शब्दांत सावंत यांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. अखेर सावंत यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांनी बिळवस येथील टॉवर ३१ डिसेंबर पर्यंत कार्यान्वित करण्याचे लेखी पत्र सावंत यांना दिले. यावेळी सावंत यांनी जिल्ह्यातील इतर बंद असलेल्या टॉवरचीही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच ठाकरे सरकारवर त्यांनी टीका केली. फक्त श्रेय घेण्याचे काम शिवसेना आणि ठाकरे सरकार करत आहे. चिपी विमानतळाचे भूमिपूजन नारायण राणे यांनी केले. मात्र, विमानतळाला जे विरोध करत होते, ते श्रेय घेण्यासाठी पुढे होते. कोकणच्या विकासासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणेंशिवाय पर्याय नाही असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.