पुढील पाच वर्षे आमदार म्हणून पुन्हा सेवा करण्याची संधी द्या ; आ. नितेश राणे यांचे आवाहन
महायुतीचे सरकार येताच आठ वर्षाचा विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात यश
कणकवली : कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघातील माझ्या जनतेची सेवा गेली दहा वर्षे प्रत्येक दिवस आणि दिवसाचे 24 तास मी केलेली आहे. या माझ्या सेवेत कोणतीही कमी पडू दिलेली नाही. आठ वर्षे विरोधी बाकावर आणि गेली दोन वर्ष सत्तेत सुद्धा मी त्याच जोमाने जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली. महायुतीचे सरकार आल्यामुळे गेल्या दोन वर्षात मागील आठ वर्षाचा विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला. आता पुढील पाच वर्ष आमदार म्हणून पुन्हा सेवा करण्याची जनतेने मला संधी द्यावी. यासाठीच मी निवडणुकीत उतरलो आहे. दहा वर्ष आपण मला जी ताकद दिली, मला साथ दिली. प्रेम दिले त्यामुळेच जनसेवा करू शकलो. या निवडणुकीत सुद्धा अशी ताकद प्रेमाने साथ द्या असे आवाहन कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी केले.
आज माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्यावर मी टीका करणार नाही. माझ्या दोन निवडणुकीमध्ये २०१४ आणि २०१९ मध्ये आपण अनुभव घेतला असेल. यावेळी माझे जुने मित्रच माझ्या विरोधात उभे केलेले आहेत. तेही माजी राणे समर्थक आहेत. विरोधी पक्षाला कोणी मिळत नव्हते. म्हणून माझ्या मित्राला माझ्या विरोधात उभे केलेले आहे. त्यांना मी शुभेच्छा देईन. मी ही निवडणूक कोणाचा हिशोब चुकता करण्यासाठी किंवा कोणावर टीका करण्यासाठी लढवत नाही, असे नितेश राणे म्हणाले .