चिपी विमानतळाची धावपट्टी वाढणार !
राज्य सरकार, एमआयडीसी कडून आयआरबीला निर्देश
शिवसेना खासदार विनायक राऊत यांची माहिती
नारायण राणेंच्या हट्टामुळे विमानतळाचे काम चार वर्षे रखडल्याचा आरोप
कुणाल मांजरेकर
चिपी विमानतळाचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने त्यांनी ३.४०० किमीच्या धावपट्टीसाठी बेस तयार करून २.७०० किमी धावपट्टी तयार केली. मात्र राज्य सरकार आणि एमआयडीसीने ही धावपट्टी पूर्ववत करण्याचे निर्देश राज्य सरकार आणि एमआयडीसीने आयआरबीला दिले आहेत, ही माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
आयआरबी कंपनीशी भागीदारी करून विमानतळाचे काम मिळवण्यासाठी राणेंचे प्रयत्न होते. चिपी विमानतळ राज्य सरकारच्या एमआयडीसी अंतर्गत झाला असता तर किमान चार वर्षे अगोदरच हे विमानतळ पूर्ण झाले असते. मात्र राणेंच्या हट्टापायी हे काम उशिराने झाले. आयआरबी कंपनीने मुंबई गोवा महामार्गाची वाट लावली आहे. विमानतळाचीही वाट लागण्याची परिस्थिती होती, पण राज्य शासनाने यामध्ये जातिनिशी लक्ष दिल्याने विमानतळ पूर्ण होऊ शकले, असेही ते म्हणाले.
… तर नारायण राणे सांगतील ते शासन स्वीकारण्यास तयार
विमानतळाची धावपट्टी दीपक केसरकर यांनी कमी केली, असा आरोप केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला होता. नारायण राणेंनी हे आरोप सिद्ध करावे, ते सांगतील ते शासन स्वीकारायला आम्ही तयार आहोत, असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे.
चिपी विमानतळाकडील ९३४ हेक्टर जागा कवडीमोल दराने खरेदी करण्याचे राणेंचे षड्यंत्र होते. मात्र त्याला ग्रामस्थांनी विरोध केला. या ग्रामस्थांना वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेने पाठिंबा दिला. हे विमानतळ राज्य सरकारच्या एमआयडीसी विभागामार्फत होणे आवश्यक होते. पण नारायण राणे यांनी टक्केवारी आणि स्वतःला पार्टनरशिप मिळविण्याच्या उद्देशाने हे विमानतळ आयआरबी या खाजगी कंपनीकडे दिले. नारायण राणे यांच्या हट्टामुळे आणि अपप्रवृत्तीमुळे याठिकाणी आयआरबी कंपनी आली. या कंपनीने राष्ट्रीय महामार्गाची वाट लावली. विमानतळाची पण वाट लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण महाराष्ट्र शासन खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्याने विमानतळाचे काम पूर्ण होऊ शकले. ही धावपट्टी वाढल्यास चिपी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने तसेच मोठी कार्गो विमाने उतरू शकतील, असे सांगून २०१४ मध्ये या विमानतळाचे काम केवळ १४ टक्के झाले होते. याबाबत लेखी अहवाल एमआयडीसीने दिला होता. मात्र त्यानंतरच्या काळात आम्ही विमानतळाच्या कामाला चालना देऊ शकलो, असे विनायक राऊत म्हणाले.