नारायण राणेंपासून भाजपा कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका !
कुडाळ मधील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात राणेंनी जाहीर व्यासपीठावरून कार्यकर्त्याना धमकावले
पंतप्रधान मोदींकडे लेखी तक्रार करणार ; खासदार विनायक राऊत यांची माहिती
केंद्र सरकारने ज्याप्रमाणे राणेंना संरक्षण दिले, तसेच संरक्षण भाजपा कार्यकर्त्यांना द्यावे
प्रत्येक निवडणूकीत रक्तरंजित राजकारण करण्याचा राणेंचा इतिहास ; जिल्हा वासीयांनी सावध रहावे
कुणाल मांजरेकर
मालवण : कुडाळ येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री असल्याचे विसरत आगामी निवडणुकीत गद्दारी केल्यास भाजपा कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची अप्रत्यक्ष धमकी जाहीर व्यासपीठावरून दिली आहे. या घटनेमुळे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नारायण राणे यांचा आजवरचा इतिहास लक्षात घेता त्यांच्या प्रत्येक निवडणुकीला रक्तरंजित इतिहास आहे. २०१४ पासून शिवसेनेने या वृत्तीला बाजूला केले आहे. मात्र आता पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा रक्ताने माखवण्याचा प्रयत्न नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून होत आहे. याबाबत आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहून सिंधुदुर्गातल्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना वाचवा, अशी मागणी करणार आहोत. केंद्र सरकारने ज्याप्रमाणे नारायण राणे यांना संरक्षण दिले, तसे संरक्षण सिंधुदुर्गातील सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मालवण नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर हॉटेल दर्यासारंग येथे खासदार राऊत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बबन शिंदे, नागेंद्र परब, यतीन खोत, मंदार केणी, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, नितीन वाळके, उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, किरण वाळके, प्रसाद आडवलकर, बाळू नाटेकर, नंदू गवंडी, सेजल परब, तृप्ती मयेकर, शिला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, पूनम चव्हाण, अंजना सामंत यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. राऊत म्हणाले, नारायण राणे यांनी भाजपच्या मेळाव्यात केंद्रीयमंत्री असल्याचे भान विसरून भाजपा कार्यकर्त्यांना मारण्याची किंबहुना त्यांचे जीवन संपवण्याची धमकी दिली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. आजपर्यंत नारायण राणे यांचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीत रक्तरंजित राजकारण करण्याचा त्यांचा भूतकाळ आहे. सुदैवाने २०१४ पासून शिवसेना येथे विजयी झाल्यानंतर आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीत नरबळी देणे, डोकी फोडणे असे प्रकार झाले नाहीत. पण पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये रक्तरंजित राजकारण नारायण राणे यांच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. या कारणामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या लेखी निवेदन सादर करणार आहोत. यामध्ये भाजपाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीविताचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी आणि ज्याप्रमाणे केंद्राच्या माध्यमातून राणेना संरक्षण दिले आहे, तसेच संरक्षण या जिल्ह्यातील भाजपाच्या जुन्याजाणत्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना देण्यात यावे अशी मागणी केली जाणार आहे. अन्यथा सिंधुदुर्गात नारायण राणे पुरस्कृत गुंडगिरीतून कार्यकर्त्यांचा जीव जाऊ शकतो. मागील सहा महिने नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात दादागिरी आणि दमदाटी सुरु आहे, याला भाजपाचे कार्यकर्ते कंटाळले आहेत, असे विनायक राऊत म्हणाले.