गाबीत क्षत्रिय आरमारी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा
गाबीत समाज जिल्हा संघटक विकी तोरसकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
मालवण : महाराष्ट्र सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये १७ प्रकारच्या वेगवेगळ्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ज्यामध्ये हिंदू धर्मातील विविध समाजाचा समावेश आहे. हिंदू धर्मातील क्षत्रिय आरमारी म्हणून ओळखला जाणारा गाबीत समाज हा विशेषतः महाराष्ट्रातील किनारपट्टीवर वसलेला आहे. या समाजाला सन ६५९ पासूनचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदुस्थानातील पहिल्या आरमाराच्या बांधणीत आणि स्वराज्याच्या लढाईत गाबीत समाजाचा मोठा वाटा आहे. पुढील काळात गाबीत समाज मासेमारीकडे वळला. हा समाज सद्यस्थितीत मासेमारी बरोबरच पर्यटन व्यवसायामध्ये भविष्य शोधीत आहे. या पार्श्वभूमीवर गाबीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गाबीत क्षत्रिय आरमारी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी गाबीत समाजाचे जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात महात्मा फुले महामंडळ अण्णासाहेब पाटील, महामंडळ शामराव पेजे महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मोद्योग महामंडळ ही महामंडळ आहेत. नाभिक समाजासाठी संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ पण स्थापन करण्यात आलेले आहे. गाबीत समाजाची वस्ती भारतातील कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र व काही प्रमाणात गुजरात येथे आढळून येते. मासेमारी व्यतिरिक्त इतरही उद्योगधंद्यात गाबीत समाज संघर्ष करीत आहे. गाबीत समाजाचा ओबीसीचा एक घटक असून तो विशेष मागास प्रवर्गात मोडतो. सरकारने मत्स्योद्योग विकास महामंडळे स्थापन केलेली आहे. परंतु सर्वंकष हिंदू गाबीत समाजाच्या विकासासाठी विशेष असे गाबीत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ गरजेचे आहे. त्यामुळे इतर जाती जमातींच्या आर्थिक विकास महामंडळाबरोबरच हिंदू गाबीत समाजाचे गाबीत क्षत्रिय आरमारी आर्थिक विकास महामंडळ त्वरित स्थापन करावे, अशी मागणी रविकिरण तोरसकर यांनी केली आहे.