VIDEO | सिंधुदुर्ग जि. प. बांधकाम विभागात बाऊन्सरना वावर ; शिवसैनिकांनी पळवून पळवून मारलं !
सावंतवाडी पं. स. च्या आठ कोटींच्या टेंडरवरून जिल्हा परिषदेत मोठा राडा ; संबधितांवर कारवाई करण्याची आ. वैभव नाईकांची मागणी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आज मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच टेंडर मॅनेज करण्यासाठी चक्क बाऊन्सर आणण्यात आले. या बाऊन्सर कडून सर्वसामान्य लोकांची कागदपत्रे तपासण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करत आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी याला आक्षेप घेतला. यावेळी काही बाऊन्सरना बेदम चोप देण्यात आला. त्यांना शिवसैनिकांनी अक्षरशः पळवून पळवून चोप दिला. या घटनेमुळे जिल्हा परिषद परिसरातील वातावरण तणावमय बनले होते. ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक होताच काही बाऊन्सर पळून गेले तर काहींना पकडण्यात यश आले आहे.
सावंतवाडी पं. स. च्या इमारतीचे आठ कोटींचे टेंडर मंजूर झाले असून या कामावरून जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सावंतवाडीच्या एका ठेकेदाराने जि. प. च्या आवारात बाऊन्सर आणून बसवले. हे बाऊन्सर कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करत असल्याचा आरोप करीत आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांच्यासह शिवसैनिकांनी याला आक्षेप घेतला. याचे रूपांतरण वादावादीत होऊन शिवसैनिकांनी या बाऊन्सरना अक्षरशः कपडे फाटेपर्यंत मारले. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून यातील काहींनी धूम ठोकली. यावेळी ओरोस पोलिसांनी येथे येऊन त्यांना सोडवले. दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषदेत बाऊन्सर कशासाठी आले ? त्यांच्यासोबत भाजपचे दोन कोणते पदाधिकारी उपस्थित होते, त्यांच्यावर सीसीटीव्ही पाहून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.