Breaking | प्रीती केळूसकर खून प्रकरण : संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
मालवण : प्रीती केळूसकर या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळून ठार मारणाऱ्या संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला कुंभारमाठ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
धुरीवाडा येथील प्रीती केळूसकर ही 34 वर्षीय महिला मालवण बस स्थानका नजीकच्या लॅब मध्ये कामाला होती. तिचे धुरीवाडा येथील एका व्यक्ती सोबत लग्न झाले होते. मात्र त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या महिलेने अलीकडे काही महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले. या रागातून तिच्या पहिल्या नवऱ्याने काल दुपारी ती काम करत असलेल्या लॅब मध्ये येऊन बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतून हातातील लायटरने तिला आग लावली. त्यानंतर तो पळून गेला. पेटलेल्या अवस्थेत ही महिला रस्त्यावर येताच परिसरातील नागरिक हादरून गेले. त्यांनी धावाधाव करून या महिलेच्या अंगावरील आग विझवून तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असताना रात्री तिचे निधन झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
या विकृती विरोधात मालवणात महिला वर्ग आक्रमक बनला असून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी आज सकाळी महिला मालवण तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना भेटून निवेदन सादर करणार आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ पथके कार्यान्वित केली होती. या आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.