‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्या ; बाहेर सापडला तर त्यालाही जिवंत जाळणार !

मालवणात सर्वपक्षीय महिला आक्रमक ; तहसीलदार पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर

मालवण : धुरीवाडा येथील पूजा केळूसकर उर्फ सौभाग्यश्वरी गोवेकर या विवाहितेवर भरदिवसा मालवण बस स्थानका समोर पेट्रोल ओतून जाळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला वर्ग आक्रमक बनला आहे. गुरुवारी शहरातील सर्वपक्षीय महिलांनी एकत्र येत हे कृत्य करणाऱ्या तिचा पहिला पती सुशांत गोवेकर याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट कोर्टमध्ये दाखल करावे, यात आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्यांचाही शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले. 

शहरातील बसस्थानक समोरील एका डायग्नोस्टिक लॅबमध्ये काम करणाऱ्या सौभाग्यश्वरी गोवेकर पूर्वाश्रमीची प्रीती केळुसकर (वय-३५) या विवाहितेवर तिचा पहिला पती सुशांत गोवेकर याने पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना काल दुपारी घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. गंभीररित्या भाजलेल्या प्रीती यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद आज उमटले. शहरातील सर्वपक्षीय महिलांनी एकत्रित येत स्कुटर रॅली काढत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या गुन्ह्यातील तिचा पती सुशांत गोवेकर याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याचबरोबर त्याच्या सहकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी हे प्रकरण फास्ट कोर्ट मध्ये दाखल करण्यात यावे. मालवण तालुक्यातील एकाही वकिलाने त्याचे वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी करण्यात आली. यात गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास आणि तो जामीनावर सुटल्याचे आढळून आल्यास आम्ही त्याला जाळून मारू असा इशारा यावेळी संतप्त महिलांनी दिला.

यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुसंस्कृत मालवणात काल प्रत्येकाला शरमेने मान खाली घालावी लागेल अशी घटना घडली आहे. खरे तर देशात महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहत असताना मालवण शहरात दिवसाढवळ्या भर दुपारी भर वस्तीत सौभाग्यश्वरी गोवेकर पूर्वाश्रमीची प्रीती केळुसकर या विवाहितेवर तिचा पहिला पती सुशांत गोवेकर या नराधमाने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले व तो पळून गेला होता. गोवेकर याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी केलेली कार्यवाही ही समाधानाची बाब आहे. मात्र प्रीती केळुसकर हिला जाळून मारण्याचा जो प्रकार झाला तो अमानुष व निंदनीय असून गोवेकर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्याच्या दृष्टीने पोलिसांनी सक्षमपणे तपास करावा व न्यायालयात त्याला कठोर शिक्षा होईल असे गोवेकर यांच्या विरोधात पुरावे गोळा करावेत. जेणेकरून यापुढे असे नीच कृत्य करण्यास कोणी धजावता नये. यासाठी पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का याचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी ही कारवाई तातडीने करण्यात यावी अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र आंदोलन उभे केले जाईल. त्याची जबाबदारी ही प्रशासनावर राहील असे नमूद करण्यात आले आहे.

यावेळी पल्लवी तारी, शितल बांदेकर, अमृता वाळके, महिमा मयेकर, शिल्पा खोत, डॉ मालविका झाट्ये, शर्वरी पाटकर, पूजा वेरलकर, अन्वेषा आचरेकर, नीनाक्षी मेतर, अंजना सामंत, विद्या फर्नांडिस, नयना पोयेकर, रश्मी परुळेकर, सोनाली पाटकर, ममता तळगावकर, प्राची माणगावकर, रेश्मा शिंदे, रूपा कुडाळकर, दिव्या कोचरेकर, प्रतिमा भोजने यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!