प्रीतीला जाळणाऱ्या “त्या” नराधमावर कठोर कारवाईसाठी गुरुवारी मालवणात महिलांचा “एल्गार” !
सकाळी १०.३० वा. भरड नाक्यावर महिला एकवटणार ; जास्तीत जास्त महिला, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुसंस्कृत मालवण शहरातील प्रत्येक नागरिकाला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना काल मालवणात घडली. धुरीवाडा येथील सौ. सौभाग्यश्वरी गोवेकर (पूर्वाश्रमीची प्रीती केळूसकर) या महिलेला तिच्याच पूर्वाश्रमीच्या पती म्हणवून घेणाऱ्या नराधमाने भरवस्तीत येऊन पेट्रोल ओतून जिवंत जाळले. मालवण सारख्या छोट्याशा शहरात घडलेल्या या घटनेमुळे समाजमनावर मोठा आघात झाला आहे. या विरोधात मालवण मधील महिला आक्रमक झाल्या असून गुरुवारी सकाळी १०.३० वाजता महिलांचे शिष्टमंडळ तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांची भेट घेणार आहे.
शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुसंस्कृत मालवणात आज प्रत्येकाला शरमेने मान खाली घालावी लागेल अशी घटना घडली आहे. खरंतर देशात महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहत असताना आपल्या मालवण शहरात दिवसा ढवळ्या भरदुपारी भरवस्तीत एका नराधमाने अबलेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. हे कृत्य करणारा पळून गेला. परंतु तो पळून जाताना त्याने मालवणच्या संस्कृती आणि सभ्यतेला काळिमा फासला. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. यापुढे असे नीच कृत्य करण्यास कोणी धजावता नये यासाठी पोलीसांनी कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून सर्वपक्षीय महिलांचे संघटन हे मालवण तहसीलदार व मालवण पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत. तरी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, अभागी सौ. प्रीतीला न्याय देण्यासाठी जात, पात, पक्ष भेद विसरून गुरुवारी सकाळी १०.३० वा. सर्वपक्षीय महिलांनी तसेच नागरिकांनी दत्त मंदिर भरड नाका मालवण येथे एकत्र जमावे, असे आवाहन सौ. शीतल बांदेकर, सौ. अमृता वाळके, सौ. राणी पराडकर, सौ. महीमा मयेकर, सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. पूनम चव्हाण, सौ. शिल्पा खोत, सौ. पल्लवी तारी आणि मालवणातील असंख्य महिला भगिनी यांनी केले आहे.