मालवण नगरपालिकेला मिळाला कायमस्वरूपी स्वच्छता निरीक्षक
युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पाठपुराव्याला यश ; पालकमंत्र्यांसह भाजपा नेते निलेश राणे यांचे वेधले होते लक्ष
मालवण : मालवण शहरातील स्वच्छता विषयक समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेला कायमस्वरूपी स्वच्छता निरीक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते निलेश राणे, मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. श्री. ताम्हणकर यांनी केलेल्या पाठपूराव्याला यश आले असून मालवण नगरपालिकेला संजय पवार हे स्वच्छता निरीक्षक उपलब्ध झाले आहेत. याबद्दल श्री. ताम्हणकर यांनी पालकमंत्र्यांसह भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार मानले असून आतातरी शहरातील स्वच्छतेच्या समस्या दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मालवण शहरातील विविध समस्यांबाबत सौरभ ताम्हणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठक निमित्त उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करत मालवण नगरपरिषदेत गेले १० वर्ष रिक्त असलेले स्वच्छता निरीक्षक हे पद त्वरित भरण्याची मागणी केली होती. तसेच भाजपचे नेते निलेश राणे आणि मुख्याधिकाऱ्यांचे देखील निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ही नियुक्ती झाल्याने सौरभ ताम्हणकर यांनी आभार मानले आहेत.