राजकोट पुतळा प्रकरण : शिल्पकार जयदीप आपटेला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी 

आर्किटेक्ट चेतन पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यात आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात येणार आहे. 

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिल्पकार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी त्याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली. 

सरकारी अभियोक्ता ॲड. तुषार भणगे म्हणाले, राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची पूर्ण चौकशी झालेली नाही. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पोलिसांकडून तपास व्हायचा आहे. तसेच लॅपटॉप अन्य साहित्य जप्त करायचे आहे. यांसह अन्य बाबींवर युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने जयदीप आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला पुन्हा ताब्यात घेऊ शकतात असेही ॲड. भणगे यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!