आय.एन.एम.डब्ल्यू.यु. च्या राष्ट्रीय सचिव पदी आशिष प्रभुगावकर
मालवण : भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार संघटना (आय एन एम डब्ल्यू यु) च्या राष्ट्रीय सचिव पदी मसुरे गावचे सुपुत्र, युवा समाजसेवक आशिष विजयसिंह (बापूसाहेब ) प्रभुगावकर यांची निवड करण्यात आली आहे. आशिष प्रभुगावकर यांचा सामाजिक संघटनात्मक उपक्रमा मधील विस्तृत आणि वैविध्यपूर्ण अनुभवाचा विचार करून भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार युनियनच्या राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय युनिट्स मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आल्याचे अमजद हसन राष्ट्रीय सरचिटणीस (आय एन एम डब्ल्य यू) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आशिष प्रभुगावकर हे माजी राज्यमंत्री कै. बापूसाहेब प्रभुगावकर यांचे सुपुत्र असून आशिष यानी आजपर्यंत राज्य, देश पातळीवर सामाजिक सेवा, कामगारांचे प्रश्न, विकासात्मक प्रश्न प्राधान्याने सोडविले आहे. सामाजिक, कला-क्रीडा यामध्येही आशिष यांचे योगदान खूप मोठे आहे.
आय एन एम डब्ल्यू यु या युनियन च्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध काम करून ही संघटना जास्तीत जास्त वाढविण्यासाठी या पदाचा उपयोग करणार असल्याची प्रतिक्रिया आशिष प्रभुगावकर यांनी व्यक्त केली आहे. श्री. प्रभुगावकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आशिष हे माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांचे बंधू आहेत.