मारुती स्विफ्ट आणि रिक्षात जोरदार धडक ; रिक्षा चालकासह तिघेजण जखमी
देऊळवाडा सागरी महामार्गावरील दुर्घटना ; जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल
मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्गावर मारुती स्विफ्ट आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घडला. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत येथील पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- कुडाळ वेतोरे येथील रिक्षा चालक अशोक अर्जुन लटम (वय-५५) हे आपल्या रिक्षा मधून इशांत भालचंद्र नागवेकर, वर्षा भालचंद्र नागवेकर (वय-५१) व भालचंद्र नारायण नागवेकर (वय-५६) या तीन प्रवाशांना घेऊन कुडाळ बिबवणे येथून मालवण कांदळगाव येथे जात असताना देवगडवरून कुंभारमाठच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी चालकाने रिक्षाच्या मध्यभागी उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा नजीकच्या मळ्यात कोसळली. रिक्षा चालक व प्रवासी खाली कोसळले. यातील वर्षा नागवेकर या महिलेला गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी रिक्षामधील प्रवाशांना बाहेर काढले व मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर डॉ. अतुल महादळे, डॉ. अहमद यांनी उपचार केले. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पवार, महादेव घागरे, शरद गुहाटे यांनी भेट देऊन पंचनामा केला.