मालवण बाजारपेठेतील कचरा समस्या काही क्षणात “जैसे थे” ; कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी मांडली भूमिका

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण बाजारपेठेतील कचरा समस्या ही नित्याचीच बाब बनली आहे. नगरपालिकेची कचरा गाडी सकाळी येऊन गेल्यानंतर काही विक्रेते याठिकाणी कचरा टाकत असल्याने काही क्षणातच बाजारपेठ परिसर कचरामय बनत आहे. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रशासन, व्यापारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधिनी एकत्र येऊन ठोस उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे मत भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे. 

बाजारपेठेतील कचरा समस्येकडे सौरभ ताम्हणकर यांनी वारंवार पुढाकार घेऊन याकडे पालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र प्रत्येकवेळी येथील कचरा पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर येथे तात्पुरता उपाय म्हणून कचरा गाडी बोलावून कचरा उचलला जातो. मात्र काही क्षणातच पुन्हा एकदा येथे कचऱ्याचे ढीग निर्माण होतात. दोन दिवसांपूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाल्याने भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पालिकेचे लक्ष वेधताच येथील कचरा गाडी पाठवून साफ करण्यात आला. मात्र हा कचरा उचलून काही वेळ होतो तोच काही क्षणात पुन्हा एकदा येथे कचऱ्याचे ढीग जमा झाले. त्यामुळे येथील कचरा सफाईचे ठोस नियोजन होणे आवश्यक आहे. 

दररोज सकाळी येथे कचरा गाडी येऊन कचरा उचलला जातो. मात्र ही गाडी येऊन गेल्यानंतर काही विक्रेते आपल्या व्यवसायचा कचरा येथे येऊन टाकतात. यामध्ये फिरत्या विक्रेत्यांचा मोठा समावेश आहे. सायंकाळी कचरा गाडी येत नसल्याने येथील कचरा दुसऱ्या दिवसा पर्यंत तसाच राहतो. त्यामुळे पालिकेने बाजारपेठेतील कचरा समस्येवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रसंगी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. गणेश चतुर्थी सण अवघ्या तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी पालिकेने या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी सौरभ ताम्हणकर यांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3525

Leave a Reply

error: Content is protected !!