ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत सुकळवाड ओरोस येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MITM) अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून जानेवारी २०२४ मध्ये ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग अभियान संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाले आहे. याचाच भाग म्हणून ११ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी पंधरावडा सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना, विद्यार्थ्यांना तसेच सर्व शासकीय संस्थांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. तसेच त्याची खरेदी व विक्री यासंबंधी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
अंमली पदार्थ विरोधी पंधरावडाचे औचित्य साधून मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तसेच विद्यार्थ्यांशी चर्चासत्राच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व त्याचे दुष्परिणाम आणि त्या दृष्टीने होणारे सामाजिक नुकसान याचे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त विनोद कदम आणि खजिनदार सौ. वृषाली कदम, एम.आय.टी.एम. कॉलेजचे डिग्री प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे, मालवण पोलीस हवालदार प्रकाश मोरे, पुरुषोत्तम कडपकर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर राकेश पाल तसेच विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.