कॅथॉलिक अर्बन बँकेचा चेक बाउंस प्रकरणी आरोपीला दंड व सहा महिन्यांचा साधा कारावास

बँकेच्या वतीने ॲड. अमोल मालवणकर, ॲड. सुरेंद्र तेली यांचा युक्तिवाद

कुडाळ : कॅथॉलिक अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. सावंतवाडी, शाखा कणकवली बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेपैकी २४ हजारांच्या रक्कमेचा चेक बाउंस केल्या प्रकरणी गोपाळ सुधाकर मुसळे (रा. कणकवली बाजारपेठ) याला कणकवली येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम २५५(२) नुसार, परक्राम्य दस्तऐवज कायदयाचे कलम १३८ अन्वये ठेवण्यात आलेल्या आरोपात दोषी ठरवून सहा महिन्याचा साधा कारावास व ३२,००० रुपये रक्कमेचा दंड ठोठावला आहे. फौजदारी प्रक्रीया संहिता कलम ३५७ प्रमाणे सदर दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्यात यावी. आरोपीने तशी रक्कम ३० दिवसाच्या आत भरावी. तशी रक्कम न भरल्यास ६ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे, असे मे. न्यायालयाने निकाल पत्रात म्हटले आहे. बँकेच्या वतीने ॲड. अमोल अशोक मालवणकर आणि ॲड. सुरेंद्र महादेव तेली यांनी युक्तिवाद केला.

कणकवली, बाजारपेठ, ता. कणकवली येथील गोपाळ सुधाकर मुसळे याने कॅथॉलिक अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. सावंतवाडी, शाखा कणकवली यांचेकडून व्यवसायासाठी रक्कम रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) चे कर्ज घेतलेले होते. सदर कर्जाच्या रक्कमेची अंशतः परतफेड करण्याकरीता गोपाळ सुधाकर मुसळे यांने पतसंस्थेस बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा कणकवलीचा रुपये २४,०००/- चा चेक दिलेला होता, परंतू आरोपी याच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे सदरचा चेक परत आलेला होता. त्यामुळे फिर्यादी कॅथॉलिक अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. सावंतवाडी, शाखा कणकवली यांनी आपले वकीलांमार्फत १६/०८/२०१७ रोजी रजिस्टर्ड मागणी नोटीस पाठविली. तरी देखील मुदतीत आरोपीने सदर चेकची रक्कम फिर्यादीकडे जमा केलेली नाही. त्यामुळे गोपाळ सुधाकर मुसळे यांचेविरुध्द कॅथॉलिक अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. सावंतवाडी, शाखा कणकवली यांनी कणकवली कोर्टात निगोशिएचल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट चॅप्टर १७ चे कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केलेली होती. सदर केसच्या कामी फिर्यादी पतसंस्थेतर्फे मॅनेजर यांचा जबाब होवून गोपाळ सुधाकर मुसळे हा चेकची रक्कम कायदेशीररित्या फिर्यादी पतसंस्थेस देणे लागत असून त्याकरीता सदरचा चेक दिलेला होता. व तो अनादरीत झालेला होता व त्यामुळे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट चैप्टर १७ चे कलम १३८ प्रमाणे गुन्हा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी पतसंस्थेचे वकील ॲड. अमोल अशोक मालवणकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय मानून आरोपीला मे. कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3519

Leave a Reply

error: Content is protected !!