VIDEO | शिल्पा खोत मित्रमंडळाचा आदर्श ; चषक अनावरणाच्या निमित्ताने सन्मान देशभक्तांचा !
महिलांच्या नारळ लढवण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या चषक अनावरणाचा मान सीमेवर लढणाऱ्या जवानांना …
अभूतपूर्व उत्साहात आणि ढोलपथकाच्या गजरात चषकांचे शानदार अनावरण ; उद्या दुपारी ४ वा. बंदर जेटीवर रंगणार शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून महिलांची राज्यस्तरीय नारळ लढवण्याची स्पर्धा
मालवण | कुणाल मांजरेकर
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सौ. शिल्पा खोत मित्रमंडळाने यावर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणच्या बंदर जेटीवर उद्या १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आ. वैभव नाईक यांच्या सहयोगाने दहावी राज्यस्तरीय महिलांची नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत विजेत्या महिलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ असलेला चषक दिला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबत दरवर्षी प्रमाणे यंदा देखील महिला वर्गात कमालीचे औत्सुक्य असून स्पर्धेच्या पूर्वसंध्येला येथील फोवकांडा पिंपळ याठिकाणी चषकांचे अनावरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अनावरणाच्या निमित्ताने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. चषक अनावरणाचा मान एनसीसी कॅडेट्सच्या उपस्थितीत ५८ महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनां देण्यात आला. यावेळी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्वराज्य संघटना मालवण, लायन्स क्लब मालवण,स्वराज्य ढोलपथक, सेवते संघटना, कोकण वाईल्ड रेस्क्यू संघटना यांच्या वतीने हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशाचे रक्षण करणाऱ्या या भावांना उपस्थित महिलांकडून राख्याही बांधण्यात आल्या. या सन्मानाने आर्मीचे जवान भारावून गेले. यावेळी स्वराज्य ढोल पथकातर्फे ढोल ताशांच्या गजरात आणि एनसीसी कॅडेट्स मुलींनी दिलेल्या मानवंदनेने ५८ महाराष्ट्र बटालियनच्या जवानांचे स्वागत करण्यात आले. जवानांचे औक्षण केल्यानंतर सौ. शिल्पा खोत यांच्या हस्ते जवानांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व मालवण या नावाचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी लायन्स क्लब मालवण आणि मातृत्व आधार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांतर्फे देखील जवानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांना राख्या बांधत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये सुभेदार जसबीर सिंग नेगी, हवालदार मारुती कांबळे, बटालियन हवालदार मेजर पी. सी. बेहरा, हवालदार राकेश बनसोडे, हवालदार राकेश पटेल, हवालदार प्रदीप पाटील या जवानांचा समावेश होता.
यावेळी प्रथमच राखी बांधून घेणारे सुभेदार नेगी यांनी भावविवश होऊन या प्रेमाबद्दल उपस्थितांचे आभार मानून बांधलेली राखी एक वर्ष हातावरच ठेवण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शिल्पा खोत यांनी जवानांमुळे आपण देशात सुरक्षित जीवन जगत असून देशासाठी लढणाऱ्या या भावांबद्दल प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला असे सांगितले. यावेळी ठाकरे शिवसेना, आम. वैभव नाईक व सौं. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेच्या बक्षीसांचे अनावरण ५८ महाराष्ट्र बटालियनच्या जवानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, नितीन वाळके, यतीन खोत, बाबी जोगी, किरण वाळके, मनोज मोंडकर, महेंद्र म्हाडगुत, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, अंजना सामंत, नंदा सारंग, एनसीसीचे लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत, लायन्स क्लबचे अध्यक्ष बाळू अंधारी, सचिव सौं. फॅनी फर्नांडिस, सौं. वैशाली शंकरदास, उमेश शिरोडकर, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, सचिव दादा वेंगुर्लेकर, दिक्षा लुडबे, नीना मुंबरकर तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्स मुली व इतर नागरिक उपस्थित होते.