मालवण शहरात १९ ऑगस्ट रोजी भव्य पर्यटन संस्कृती रिक्षा रॅली

रिक्षा सजावट स्पर्धेचेही आयोजन ; प्रथम तीन विजेत्यांना भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून रोख पारितोषिके

पर्यटन व्यावसायिक महासंघ, रिक्षा व्यवसायिक संघटना आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने आयोजन

मालवण : नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यटन व्यावसायिक महासंघ, रिक्षा व्यवसायिक संघटना आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण शहरातून भव्य पर्यटन संस्कृती रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे, तसेच यानिमित्त रिक्षा सजावट स्पर्धाही घेण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

येथील हॉटेल महाराजा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी बाबा मोंडकर यांच्यासमवेत पर्यटन महासंघाचे शहराध्यक्ष मंगेश जावकर, रिक्षा संघटना अध्यक्षा पप्या कद्रेकर, पूजा सरकारे, किशोर दाभोलकर, रवींद्र खानविलकर, दर्शन वेंगुर्लेकर, निलेश लुडबे, वरद धुरी, दीपक बांदकर, धनेश हडकर, राजा मांजरेकर, प्रसाद वराडकर, हेमंत कांदळकर, राजू डिंगणकर, ऐश्वर्य मांजरेकर, प्रसाद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. श्री. मोंडकर म्हणाले, मालवण हे पर्यटन शहर असून रिक्षा व्यावसायिक हे पर्यटनाचा महत्वाचा दुवा आहेत. म्हणूनच येथील संस्कृती व पर्यटन सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी या रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या रॅलीचे तिसरे वर्ष आहे. या रॅलीत तालुक्यातील रिक्षा व्यावसायिक सहभागी होणार आहेत. नारळी पौर्णिमेदिवशी दुपारी ३ वाजता भरड नाका येथून मालवण बंदर जेटी पर्यंत रॅली काढण्यात येणार असून रॅली नंतर श्रीफळाची पूजा अर्चा करून श्रीफळ सागराला अर्पण करण्यात येणार आहे. या रॅली निमित्त रिक्षा सजावट स्पर्धा देखील आयोजित केली असून यासाठी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी बक्षिसे पुरस्कृत केली आहेत. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी रिक्षा व्यवसायिकांनी आपली रिक्षा पारंपरिक पद्धतीने तसेच पर्यावरण पूरक पद्धतीने सजविणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रिक्षा व्यवसायिकांनी पप्या कद्रेकर ९८२३०९६१५६, रवींद्र खानविलकर (तारकर्ली) – ९८६००१३२३८ व हेमंत कांदळकर ९४२१२६३०३९ यांच्याशी संपर्क साधावा, जास्तीत जास्त रिक्षा व्यवसायिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी श्री. मोंडकर यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!