पत्रकार भूषण मेतर यांच्यासह तिघांना मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर
शिक्षक प्रवीण कुबल व उद्योजिका पुष्पलता आजगावकर यांचाही समावेश
मालवण : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातृत्व आधार फाउंडेशनने आपल्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर केले असून पत्रकार भूषण मेतर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी भूतनाथ मालवणचे शिक्षक प्रवीण कुबल यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि काळसे धामापूर येथील ज्येष्ठ उद्योजिका श्रीमती पुष्पलता आजगावकर आजी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता वायरी येथील केळबाई मंदिर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे आणि सचिव दादा वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज मातृत्व आधार फाउंडेशनने हे पुरस्कार जाहीर केले. गेली पाच वर्षे मालवणच्या सामाजिक क्षेत्रात मातृत्व आधार फाउंडेशन ही संस्था कार्य करीत असून या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२४ रोजी मालवणचे सुप्रसिद्ध डॉक्टर सुभाष दिघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोस्ट ऑफिस मधील सेवानिवृत्त अधिकारी एम. डी. जोशी, दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद धुरी, साईकृपा अपंग सेवा संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मातृत्व आधार फाउंडेशनने केले आहे.