मालवण शहरातील “त्या” शूरवीर बालकांचा जिल्हा प्रशासनामार्फत उद्या होणार सत्कार
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष विजय केनावडेकर यांचे पालकमंत्र्यांकडे विशेष प्रयत्न
मालवण : मालवण शहरात बंदरजेटी येथे ११ मे २०२४ रोजी खोल समुद्रामध्ये पर्यटक बुडत असताना त्याला वाचवून जीवदान देण्याचे काम करणाऱ्या शहरातील “त्या” शूरवीर बालकांचा उद्या स्वातंत्र्यदिनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
यामध्ये कु. समर्थ केदार गावकर (वय वर्ष ९), कु. सुरेंद्र केदार तन्वी (वय वर्ष 11), कु. हर्ष शिवाजी कुबल (वय वर्ष 12), व कु.वरद गणेश सापळे (वय वर्ष 12) यांचा समावेश आहे. या शूर विद्यार्थ्यांनी आपला जीव धोक्यात घालून समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचे प्राण वाचवले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने त्यांचा यशोजित सत्कार व्हावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी मालवणतर्फे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती. ही मागणी मंजूर करून उद्या १५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग नगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन व सिंधुदुर्ग पोलीस विभागामार्फत हा बालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. केंद्र शासनामार्फत पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार देण्यात येतो. यासाठी या शूर बालकांचा प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. या गौरवासाठी भाजपा प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.