कोळंब ग्रामपंचायतमध्ये साडेचार लाखांचा आर्थिक अपहार
सरपंच सिया धुरी, ग्रामसेवक प्रकाश सुतार यांच्यावर कारवाईची मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील कोळंब ग्रामपंचायतमध्ये साडेचार लाखांचा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. या अपहाराला जबाबदार असलेल्या सरपंच सिया धुरी यांच्यासह ग्रामसेवक प्रकाश सुतार यांच्यावर शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ कारवाई करण्याची मागणी उपसरपंच विजय नेमळेकर यांच्यासह पाच ग्रा. पं. सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात कोळंब येथील मंगेश मधुकर चव्हाण यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ग्रा. पं. च्या अभिलेखांची गट स्तरावरून चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवालानुसार सरपंच सिया रामचंद्र धुरी यांनी वित्त आयोगाची रक्कम खर्च करताना व ग्रामनिधीतील रक्कम खर्च करताना आवश्यक वित्तीय नियमांची दक्षता घेतलेली नाही व ग्रामपंचायत आर्थिक व्यवहारात एकूण ४ लाख ५२ चार हजार ४९६ रुपये एवढ्या रकमेची अनियमितता केल्याचे आढळून आले होते. तसेच ३२ हजार १५ रुपये एवढी रक्कम वसूल पात्र ठरत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे वस्तुस्थितीप्रमाणे सरपंच ग्रामपंचायत कोळंब यांनी आर्थिक अनियमित्ता केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३८(१) प्रमाणे कर्तव्यात कसुर केल्याचे समजून कलम ३९ अन्वये चौकशीचा आदेश होण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३० मे २०२४ रोजी अहवाल पाठवला आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रा. पं. सदस्य संजना शेलटकर, स्वप्नील परब, संपदा प्रभू, नंदा बावकर आदींनी केली आहे.