दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून घुमडाई मंदिरात होणाऱ्या भजन स्पर्धेचे आयोजन वाखाणण्याजोगे
भजन सम्राट भालचंद्र केळूसकर यांचे प्रतिपादन ; “श्रावणधारा” अंतर्गत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन
मालवण | कुणाल मांजरेकर
दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात होत असलेली भजन स्पर्धा आदर्श घेण्यासारखी आहे. याठिकाणी अतिशय शिस्त पाळली जाते. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. तरीदेखील कोणतेही गालबोट न लागता ही स्पर्धा अविरतपणे सुरु आहे. यासाठी दत्ता सामंत दाखवत असलेले औदार्य आणि ग्रामस्थांची त्याला असलेली साथ यामुळेच जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात या भजन स्पर्धेचा नावलौकिक झाला आहे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजन कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करताना स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन भजन सम्राट भालचंद्रबुवा केळूसकर यांनी घुमडे येथे बोलताना केले.
मालवण तालुक्यातील घुमडे येथे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या “श्रावणधारा” कार्यक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृती प्रित्यर्थ नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा घुमडाई मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी श्री. केळूसकर बुवा बोलत होते. या स्पर्धेचे उदघाटन घुमडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष भाई परब यांच्याहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर दत्ता सामंत, परीक्षक भालचंद्र केळूसकर बुवा, जनार्दन देसाई, बाबू बिरमोळे, गोपी लाड, उमेश देसाई, प्रदीप बिरमोळे, रामदास बिरमोळे, दत्ताराम सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी भालचंद्र केळूसकर यांनी स्पर्धेच्या सातत्यपूर्ण आयोजनाचे कौतुक केले. दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रत्येक ग्रामस्थ मंदिरातील कार्यक्रम आपल्या घरचा कार्यक्रम असल्याप्रमाणे योगदान देतो. त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. देवीचा आशीर्वाद या मंडळींच्या पाठीशी आहे, येथे येणाऱ्या भजन मंडळानी या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे सांगून गेली दहा वर्षे ही स्पर्धा हसत खेळत सुरु आहे. या स्पर्धेला गालबोट लागेल असे वर्तन कोणी करू नये, आणि स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेचे उदघाटक भाई परब म्हणाले, श्रावणधारा ही संकल्पना दत्ता सामंत यांच्याकडून आलेली आहे. ते कलेचे उपासक आहेत. ज्या गुरूंनी आपल्याला भजन शिकवलं, त्या गुरुचा योग्य तो सन्मान करण्यासाठी सतत दहा वर्षे या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतून आपल्या गुरूला गुरुदक्षिणा ते देत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी उद्योजक बाबू बिरमोळे यांनी देखील विचार मांडले. सूत्रसंचालन राजा सामंत यांनी करून आभार मानले. यावेळी माजी सरपंच दिलीप बिरमोळे, उमेश बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत, दत्तू बिरमोळे, अंकित बिरमोळे, राजा बिरमोळे, गणपत बिरमोळे, निहार टेम्बुलकर, संकेत बिरमोळे, उमेश परब, सुभाष गावडे, भूषण गावडे, भाऊ सावंत, दिनेश बाईत, सुनील टेम्बुलकर, शानू वालावलकर, सूरज बिरमोळे यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, आई घुमडाई देवीच्या आशीर्वादामुळेच गेली दहा वर्षे श्रावणधारा कार्यक्रम आणि ही भजन स्पर्धा सुरु आहे. तिला वाटत म्हणून हे कार्यक्रम होतात. आम्ही निमित्तमात्र आहोत, असे सांगून पुढील वर्षी पासून आमने सामने लाईव्ह भजन स्पर्धा घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त करून याबाबत भजन मंडळांशी बोलणे करण्यात येईल असे सांगितले.
उद्या १५ ऑगस्टला होणारी भजने शनिवारी होणार
गुरुवार दि. १५ ऑगस्ट रोजी होणारी भजने शनिवारी १७ ऑगस्टला होणार आहेत. यात सायंकाळी ५ वा. श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ (बुवा अद्वैत पालव), सायंकाळी ६ वा. स्वर संगम प्रासादिक भजन मंडळ कासरल कणकवली ( बुवा अमोल चव्हाण), सायंकाळी ७ वा. श्री लक्ष्मी नारायण प्रासादिक भजन मंडळ वालावल कुडाळ (बुवा सूरज लोहार), रात्री ८ वा. श्री स्वामी समर्थ भजन मंडळ वेर्ले बांदा (बुवा अक्षय कांबळी) यांची भजने होणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
श्रावणधारा उत्सवाचा उर्वरित कार्यक्रम
मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी (बुवा विराज तांबे), सायंकाळी ६ वा. श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ मातोंड वेंगुर्ले (बुवा – सचिन सावंत), सायंकाळी ७ वा. श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ बाव कुडाळ (बुवा लक्ष्मण नेवाळकर), रात्री ८ वा. श्री महापूरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी कुडाळ (बुवा प्रसाद आंबडोसकर) यांचे भजन होणार आहे. मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाट कणकवली ( बुवा हेमंत तेली), सायंकाळी ६ वाजता श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ माजगाव सावंतवाडी (बुवा कुणाल वारंग), सायंकाळी ७ वा. श्री नादब्रम्ह प्रासादिक भजन मंडळ कसाल (बुवा सुंदर मेस्त्री), रात्री ८ वाजता श्री देवी माऊली प्रासादिक भाजन सेवासंघ इन्सुली सावंतवाडी (बुवा वैभव राणे) यांची भजने होणार आहेत. गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद होणार असून सायंकाळी ७ वा. “भीषण स्वरूपी राजयक्षमा” हा संयुक्त दशावतारांचा महान पौराणिक संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांचा समावेश असेल. मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार असून सायंकाळी ७ वाजता “चिंतामणी जन्म” हा संयुक्त दशावताराचा महान पौराणिक संघर्ष मय दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. यामध्ये देखील दिग्गज कलाकारांचा भरणा आहे. तरी श्री देवी घुमडाई मंदिरात होणाऱ्या या मंगल धार्मिक सोहळ्यास भाविक व भजन श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.