रामगडमध्ये बुडालेल्या बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

रामगड गावावर शोकळला ; सात वर्षापूर्वीच वडीलांचे छत्र हरपले

पोईप | प्रसाद परब

मालवण तालुक्यातील रामगड बेटे येथे गळाने मासे पकडण्यासाठी गेलेल्या रामगड कुंभारवाडी येथील राहूल कृष्णा जिकमडे या युवकाचा मृतदेह आज तिस-या दिवशी सकाळी शोधमोहिमे दरम्यान घटनास्थळा पासून सुमारे पाचशे मिटर अंतरावर खडकाची कोंड येथे ग्रामस्थांच्या शोध मोहिमेत दिसून आला.

मिळालेल्या माहितीनुसार राहूलला गळाने मासे पकडण्याचा छंद होता. मात्र तो स्वतः मासे खात नव्हता. अतिशय हुशार म्हणून राहूल ओळखला जात होता. बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंटसाठी कणकवली येथे त्याने प्रवेश घेतला होता. सात वर्षापूर्वीच वडीलांचे छत्र हरपल्याने त्याच्या आईने कष्टाने त्यांना सांभाळले होते, शिकवले होते. उशिरापर्यंत तो मासेमारीसाठी थांबत असल्याने गुरुवारी सायंकाळी तो आला नाही म्हणून राहूलच्या आईने आणि बहिणीने त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. ग्रामस्थही शोध मोहिमेत सहभागी होते. याबाबत आचरा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. ग्रामस्थ, पोलीस, महसूल, स्थानिक प्रशासन तसेच आपत्ती यंत्रणा, एनडीआरएफ, टीम जय बालाजी सर्च अँड रेस्क्यू टीम मालवण सदस्य वैभव खोबरेकर, सुजित मोंडकर, समीर गोवेकर, प्रसाद मयेकर, छगन सावजी, भूषण जुवाटकर आदी स्कुबा डायव्हर या मोहिमेत सहभागी झाले. तिस-या दिवशी शनिवारी सकाळी रामगड सरपंच शुभम मठकर पो.पा नारायण जिकमडे, सुरेंद्र जिकमडे, अविनाश सादये, विष्णू कोळबकर, सुमेश सादये महेश पारकर, बंटी जाधव यांसह अन्य ग्रामस्थांनी जेथे राहूल मासे पकडण्यासाठी गेला होता त्या भागात शोध मोहीम सुरू केली. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळा पासून अंदाजे पाचशे मिटर अंतरावर खडकाची कोंड येथे ग्रामस्थांना राहूल जिकमडे याचा मृतदेह आढळून आला. राहूलच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण रामगड गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी असा परिवार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!