घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट मिळणार

भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश ; प्रदेश सचिव हरी चव्हाण यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ नोंदीत घरेलु कामगारांना लाभ मिळणार

मालवण : महाराष्ट्रातील जे घरेलु कामगार १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत आहेत, अश्या घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. यास अनुसरून भारतीय मजदूर संघाने कामगारमंत्री सुरेश खाडे व सर्व जिल्हा पालकमंत्री यांना निवेदन देऊन मर्यादित मुदत अट रद्द करुन सर्व नोंदणीकृत घरेलु कामगारांना भांडी संच भेट वस्तू देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला यश मिळाले असून जे घरेलु कामगार ३१ जुलै २०२४ पर्यंत मंडळांंतर्गत नोंदीत आहेत, अश्या सर्व घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट वस्तू मिळणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी दिली आहे.

महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळांतर्गत घरेलु कामगार नोंदणी, नुतनीकरण वाढविण्याच्या दृष्टीने घरेलु कामगार लाभार्थी जे १५ फेब्रुवारी २०२४ रोजी अखेर नोंदणीकृत आहेत अश्या महाराष्ट्रातील ३१ हजार ६०९ एवढ्या घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट वस्तू देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता. त्यास अनुसरून महाराष्ट्रात घरेलु कामगार नोंदणी व नूतनीकरणात वाढ झाली. वाढीव नोंदीत झालेल्या घरेलु कामगारांनाही या भेट वस्तू संचाचा लाभ मिळावा यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याजवळ मागणी करण्यात आली होती तसेच सर्व जिल्हा पालकमंत्री यांचेही लक्ष वेधण्यात आले होते. मालवण येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची नूकतीच घरेलु कामगारांनी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन या प्रकरणी व अन्य प्रश्नांसंदर्भात लक्ष घालण्याची मागणी केली होती. यावेळी पालकमंत्री यांनी कामगारमंत्री यांच्या सोबत वैयक्तिक संपर्क साधण्याचे आश्वासन भारतीय मजदूर संघ व घरेलु कामगार यांना दिले होते.

भारतीय मजदूर संघाने केलेला पाठपूरावा व पालकमंत्री यांनी त्यांच्या पातळीवर केलेले प्रयत्न याला यश मिळाले असून, १५ जुलै २०२४ नंतर महाराष्ट्रात ३१ जुलै २०२४ अखेर पर्यंत १६ हजार ९०४ एवढी वाढलेली नोंदणी लक्षात घेऊन ३१ जुलै २०२४  रोजी अखेर पर्यंतच्या एकुण ४८ हजार ५१३ एवढ्या महाराष्ट्रातील घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट वस्तू मिळणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ९१६ एवढ्या लाभार्थी नोंदीत घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट वस्तूंचा लाभ मिळणार आहे. घरेलु कामगारांना त्यांच्या साठी निर्माण मंडळामार्फत पेन्शन योजना, संन्मान धन, मुलांसाठी शैक्षणिक आर्थिक मदत, आरोग्य तपासणी व उपचार, विमा योजना, मृत्यू नंतर वारसास आर्थिक मदत आदी मागण्यांची शासनाने पूर्तता करण्याची मागणी मजदूर संघाने करुन, कामगार मंत्री व पालकमंत्री यांनी लक्ष घालून मागण्यांच्या पूर्णतेच्या दृष्टीने पाऊल उचलले याबद्दल घरेलु कामगारांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती हरी चव्हाण यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!