पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गात ‘जनता दरबार’ ; १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान आयोजन

विधानसभा क्षेत्रनिहाय जनतेच्या तक्रारी स्विकारणार

सिंधुदुर्ग दि ०९ (जिमाका) सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतुसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘जनता दरबार’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार दि १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नवीन नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस- सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे. तरी नागरिकांनी जनता दरबारामध्ये आपल्या तक्रारी सादर करण्याचे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.

विधानसभा क्षेत्रनिहाय जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार दि १२ ऑगस्ट रोजी कणकवली विधानसभा क्षेत्रातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. दि. १३ ऑगस्ट रेाजी कुडाळ विधानसभा क्षेत्रातील कुडाळ व मालवण आणि दि १४ ऑगस्ट रोजी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. जनता दरबारामध्ये उपस्थित होणाऱ्या तक्रारी, अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने जबाबदार अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!