महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कुडाळ मालवण तालुक्यांचे दीड कोटी सरकारने थकवले
गणेश चतुर्थी अगोदर निधी मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार : आमदार वैभव नाईक यांचा इशारा
मालवण : महाराष्ट्र राज्याच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गुरांचा गोठा, सिंचन विहीर, बायोगॅस प्रकल्प, शेततळे, वृक्षलागवड कंपोस्ट खत/गांडूळ खत टाकी, कुक्कुटपालन शेड आदी कामे मंजूर करण्यात येतात. कुडाळ मालवण तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामगारांचे मजुरीची, तसेच सार्वजनिक आणि वैयक्तिक कामाच्या साहित्यासाठीची एकूण १ कोटी ५५ लाख ३९ हजार ९०३ रु रक्कम सरकारने थकीत ठेवली आहे. लाभार्थ्यांनी कर्जे काढून, उसणवारी घेऊन सदर कामांसाठी खर्च केला आहे. मात्र कामे पूर्ण झाली तरी शासनाकडून मंजूर कामांसाठी निधी देण्यात आलेला नाही. कुडाळ व मालवण पंचायत समिती मार्फत सदर निधीची मार्च २०२३ पासून राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकार एकीकडे नवीन योजना जाहीर करत आहे. आणि दुसरीकडे पूर्वीच्या योजनांचा निधी थकीत ठेवून राज्य सरकार लाभार्थ्यांवर अन्याय करत आहे. जर गणेश चतुर्थी अगोदर हा निधी मंजूर झाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.