कुडाळ – मालवणवर पुन्हा एकदा शिवसेनेचा दावा ; इकडचा उमेदवार धनुष्यबाणावरच हवा

शिवसेनेचे निरीक्षक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर यांची माहिती ; लवकरच शिवसेनेत अनेकांचे पक्षप्रवेश 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण-कुडाळ विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या मतदार संघावर आजपर्यंत शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही या मतदार संघातून शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार आहे. या मतदार संघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छूक असून लवकरच अनेक बडे चेहरे शिवसेना शिंदे गटात दाखल होतील. येत्या १० ऑगस्टला शिवसेना नेते रविंद्र फाटक सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येत असून यावेळी अनेक प्रवेश होणार आहेत, अशी माहिती शिंदे गट शिवसेनेचे कुडाळ- मालवण मतदार संघाचे निरीक्षक बाळा चिंदरकर व दिपक वेतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शहरप्रमुख प्रियांका मेस्त्री, ऋत्वीक सामंत, हर्षद पाटकर, प्रथमेश सावंत, मिहिर राणे, क्रांती धुरी, दर्शना मालंडकर, गुड्डीन फर्नाडिस, गितांजली लाड, किसन मांजरेकर, भक्ती कवटकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, गीता नाटेकर, सुरेखा आस्वलकर, कविता मोंडकर, आशा बळपी, निलम शिंदे, अश्विन हळदणकर, चंद्रकांत गौलतकर, अरूण तोडणकर, शिवम हिर्लेकर, कमलकांत पारकर, शुभम सावंत, भावेश सावंत तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईकर चाकरमान्यांना मोफत कोकणात आणण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार प्रत्येक गावात एसटी अगर लझरी बसेस सोडून चाकरमान्यांना मोफतपणे गणपती उत्सवासाठी कोकणात आणणार आहोत. कोकणी माणूस शिवसेनेची जान आहे, त्याच्यासाठी आम्ही सर्वोतोपरी काम करणार आहोत. कोकणातील प्रत्येक घरात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेतून प्रस्ताव सादर होण्यासाठी आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रत्येक घरापर्यंत राज्य शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी एकदिलाने काम करत असून लवकरच याचे परिणाम सर्वत्र दिसून येणार आहेत, असेही चिंदरकर व वेतकर म्हणाले.

पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री

शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेच असणार आहे. शिंदे यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत. अनेक युवकांना रोजगार देण्याबरोबरच महिलांनाही सक्षम करण्यासाठी बचतगटांना प्रोत्साहन दिलेले आहे. शासकीय नोकर भरतीही मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक युवक आज शासकीय कर्मचारी, अधिकारी म्हणून कार्यरत झालेले दिसून येत आहेत. अनेक उद्योगांना आवश्यक सहकार्य केल्याने अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्येही अनेक कुटुंबियांना मदतीचा हात दिलेला आहे. यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता पूर्ण बहुमतात येवून शिंदे हेच मुख्यमंत्री होणार आहेत, असाही दावा श्री. चिंदरकर व वेतकर यांनी केला आहे.

सध्या सर्वत्र राजकीय प्रवेशाच्या बातम्या दिसत आहेत, आम्ही लहान लहान फटाके न फोडता मोठे फटाके फोडणार आहोत. शिवसेना नेते रविंद्र फाटक यांच्या पहिल्याच दौऱ्यात अनेकांनी प्रवेश केला आहे. आता दुसऱ्या दौऱ्यात याहिपुढील चित्र दिसून येणार आहे. आणि निवडणुकीपर्यंत मालवण – कुडाळ मतदार संघात शिवसेनेचे मजबुत संघटन दिसून येईल. आम्ही कार्यकर्त्यांना विश्वास देणार असून नवनवीन कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्यांवर कायमच विश्वास राहणार असून नवीन कार्यकर्त्यांना संघटनात्मक पदे निर्माण करून त्यांनाही संधी देण्यात येणार असल्याचेही श्री. चिंदरकर व वेतकर यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!