भोगवे तेरवळेवाडी ग्रामस्थांनी मानले भाजपा नेते, प्रशासनाचे आभार
बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरु करण्याची खा. नारायण राणे, ना. रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, माजी आ. राजन तेलींची ग्वाही ; पतन अधिकाऱ्यांची भेट
वेंगुर्ला (प्रतिनिधी) कर्लीखाडी आणि समुद्र संगमाच्या ठिकाणी वसलेल्या भोगवे तेरवळेवाडीला जोडणारी पायवाट सागरी अतिक्रमणामुळे लुप्त झाली आहे. त्यामुळे सागरी उधाणात येथील ग्रामस्थांची गैरसोय होत असून माजी सभापती निलेश सामंत, युवा कार्यकर्ते रामा पाटकर यांनी जिल्हा भाजपाच्या बैठकीत याकडे खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, माजी आ. राजन तेली यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्ह्याच्या आपत्कालीन निधी मधून या कामाला सुरुवात करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत श्री. रामा पाटकर यांनी खा. नारायण राणे, ना. रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, माजी आ. राजन तेली यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत. या कामाला लवकरात लवकर गती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
भोगवे तेरवळेवाडी या वाडीची लोकसंख्या ५० च्या आसपास आहे. मात्र समुद्राच्या किनारून जाणारी येथील पायवाट खचली असून सागरी लाटांच्या तडाख्यामुळे ही पायवाट उधाणाच्या काळात लुप्त होते. त्यामुळे या वाडीचा गावाशी संपर्क तुटतो. सागरी उधाणात या पायवाटेवर तीन ते चार फुट पाणी येते. गावात लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आहेत. त्यांनी यावेळी प्रवास कसा करायचा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतचे वृत्त कोकण मिरर वरून प्रसिद्ध होताच माजी सभापती निलेश यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. येथे बंधाराकम रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. हा निधी लवकरात लवकर खर्च करण्यासाठी पालकमंत्री तसेच अधिकारी वर्गशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन भोगवे तेरावळे सातेरी मंदिर जेटी ते तरीची जेठी येथील बंधारा वाहून गेल्यामुळे पायवट बंद झाल्याबाबतचे निवेदन त्यांना दिले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. तसेच जिल्हा भाजपाच्या बैठकीत भाजपा नेत्यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले होते.