वैभव नाईक “सर्वपक्षीय” निष्ठावान आमदार ; निलेश राणेंचा टोला
आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण आणण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आमच्यापेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन दाखवा
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून यावर्षी भव्य दिव्य प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप निलेश राणे यांनी आपल्या “एक्स” अकाउंटवरून केला आहे. कितीही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही या वर्षी मोठ्या उत्साहाने दही हंडी उत्सव साजरा करणारच असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हा आरोप करतानाच “सर्वपक्षीय” निष्ठावान आमदार असा उल्लेख करीत वैभव नाईक यांना निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.
याबाबत आपल्या एक्स अकाऊंट वरून केलेल्या पोस्टमध्ये निलेश राणे यांनी म्हटले आहे की, “कितीही प्रयत्न सर्वपक्षीय निष्ठावान आमदार वैभव नाईक यांनी आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण निर्माण करण्याचे केले तरीदेखील आम्ही मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव यावर्षी देखील साजरा करणार. माझी विनंती आहे वैभव नाईक यांना की त्यांनी आमच्यापेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन दाखवावा जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना चांगला कार्यक्रम बघायला मिळेल. मागच्या १० वर्षामुळे कुडाळ मालवणच्या लोकांना अठराव्या शतकातलं जीवन जगावं लागत आहे, त्यांना त्यातून बाहेर काढावं हा आमचा प्रयत्न आहे. त्याला हातभार सर्वपक्षीय निष्ठावान आमदार वैभव नाईक यांनीही लावावा असा आमचा त्यांना आग्रह आहे.”