मालवणात हत्तीरोगाचे नव्याने दोन रुग्ण आढळले
शहर जोखीमग्रस्त ; उद्या रात्री आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण शहराचे सर्वेक्षण होणार
मालवण : आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये शहरात नव्याने दोन हत्ती रोगाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर जोखीमग्रस्त बनले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २६ जुलै रोजी रात्री ८ ते रात्री १२ यावेळेत आरोग्य पथकामार्फत संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
नियमित हत्तीरोग सर्वेक्षण कार्यक्रम मालवण शहरातील राहणाऱ्या व्यक्तींचे मे २०२४ मध्ये १९७ रक्त नमुने व जून २०२४ मध्ये ७८५ व्यक्तीचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये १ रुग्ण हत्तीरोग दूषित रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे जोखीमग्रस्त भागातील लोकांचे आरोग्य विभागाच्या ८ पथका मार्फत मालवण शहरातील सोमवार पेठ, गवंडीवाडा, भरड नाका या भागातील १३३२ व्यक्तीचे रक्त नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी २३ जुलै रोजी अजून २ रुग्ण गवंडीवाडा, भरडनाका या भागात आढळून आले आहेत. त्यामुळे मालवण शहर पूर्ण जोखीमग्रस्त भाग असल्याने संपूर्ण शहराचे सर्वेक्षण आरोग्य पथकामार्फत शुक्रवारी रात्री ८ ते रात्री १२ या वेळेत करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.