मुलींनी चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक वेळीच ओळखणे आवश्यक
सिंधुदुर्ग महाविद्यालयातील उत्कर्षा अभियानाच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांचे प्रतिपादन
मालवण (कुणाल मांजरेकर) : मुली वयात येताना प्रेम, आकर्षण, मैत्री यातील सीमारेषा ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे. स्पर्श कोण करते, कुठे करते, किती वेळ करते आणि स्पर्श केल्यानंतर आपल्या मनात कोणत्या भावना उत्पन्न होतात, या चतु:सुत्रीवर कोणता स्पर्श चांगला आहे किंवा वाईट आहे, हे ठरवावे, असे प्रतिपादन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. सुमेधा नाईक यांनी येथे बोलताना केले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थिनींना मासिक पाळी विषयी सविस्तर माहिती मिळावी, त्यांचे आरोग्य उत्तम रहावे या दृष्टीने प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उत्कर्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या अभियाना अंतर्गत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्नित रामभाऊ परूळेकर कनिष्ठ महाविद्यालयात “मासिक पाळी व्यवस्थापन” व “चांगला स्पर्श व वाईट स्पर्श “या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारिरीक व मानसिक बदल, मासिक पाळीचे परिणाम, हार्मोन्स मधील बदल इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थिनींना बोलते करत चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श या संकल्पना उदाहरणांसह स्पष्ट केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. स्नेहा बर्वे यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत प्रा. अन्वेशा कदम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मिलन सामंत यांनी प्रयत्न केले तर प्रा. हर्षदा धामापुरकर यांनी आभार मानले. यावेळी उत्कर्षां अभियानाच्या अकरावी आणि बारावी इयत्तेतील विद्यार्थिनी प्रतिनिधींची निवड करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी रेश्मा पांढरे आणि क्षितिजा खरवते, तसेच बारावीची विद्यार्थिनी दिक्षा झोरे यांच्या कोंकण मान्सून मॅरॅथॉन स्पर्धेतील यशाबद्दल डॉ सुमेधा नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.