Malvan | मुख्याधिकाऱ्यांची तत्परता ; सुट्टीच्या दिवशीही शहर स्वच्छतेसाठी पुढाकार
बाजारपेठेसह शहरात स्वतः फिरून घेतला स्वच्छतेचा आढावा : पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी केल्या तात्काळ उपाययोजना ; व्यापारी वर्गाशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे सुट्टीच्या दिवशी देखील कमालीचे ऍक्टिव्ह दिसून आले. बुधवारी आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या सुट्टीच्या दिवशी देखील मालवण शहरात मुख्याधिकारी संतोष जिरगे हे अधिकारी वर्गासह रस्त्यावर पाहायला मिळाले. मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकारी वर्गाला सोबत घेऊन कुंभारमाठ येथून मालवण शहरात फिरून शहर स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी व्यापारी वर्गासमवेत चर्चा करून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. गेले काही दिवस संततधार कोसळलेल्या पावसामुळे मालवण शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून राहिले आहे. काही ठिकाणी घर परिसरात पाणी साचून दलदल झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी पाणी साचलेल्या सर्व ठिकाणी भेट देत पहाणी केली. यावेळी पाणी वाहून जाण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या आहेत.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अधिकारी वर्गाला विकास कामांवरून कानपिचक्या दिल्या होत्या. त्यामुळे बुधवारी सुट्टीच्या दिवशी देखील अनेक शासकीय कार्यालये सुरु असलेली पाहायला मिळाली. मालवण शहरात मुख्याधिकारी संतोष जिरगे हे जातींनीशी शहरातील स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेताना दिसून आले. यावेळी त्यांनी कुंभारमाठ ते मालवण शहर असा पाहणी दौरा करून येथील पावसाळी कामांची पाहणी केली. शहरातील भरड, एलआयसी ऑफिस, सोमवार पेठ, धुरीवाडा, मेढा या भागात त्यांनी पाहणी केली. पावसाळी पाणी जाण्याबाबत काही ठिकाणी जेसीबी साहाय्याने गटार रुंदीकरण, गटारात वाहून आलेला कचरा निचरा, काही ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी नवे मार्ग तयार करणे. मोऱ्या साफसफाई आदिंसह अन्य उपाययोजना करण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी यांच्या सोबत पालिका अधिकारी महेश परब, सोनाली हळदणकर, मिथुन शिगले, आनंद वळंजू, हेमंत आचरेकर यांसह संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर व स्वच्छता कर्मचारी भाई चिंदरकर, मिलिंद कासले व अन्य कर्मचारी उपस्थित होते.