मालवणात अतिवृष्टीने पडझड ; माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केली पाहणी
मदत कार्यात सहभाग ; भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण व पदाधिकाऱ्यांचा सहभाग
मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण शहर परिसरात पावसाचा जोर कायम असून शहरात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच मदतकार्यात सहभाग घेतला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह शुभम लुडबे, अनिष तळगावकर, मयू पारकर, बाळा जाधव आदी उपस्थित होते.
शहरातील धुरीवाडा येथे मुख्य रस्त्यावर भलेमोठे आंब्याचे झाड कोसळले. यामुळे वीज खांब, वीज वाहिन्या तुटल्या. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. झाड कोसळले त्यावेळी या मार्गांवरून जाणारे श्री. गोलतकर हे दुचाकी चालक जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. श्री. गोलतकर यांची दीपक पाटकर यांनी भेट घेतली.
रेवतळे मार्गावर शरद कांबळी यांच्या घरा नजीक आंब्याचे झाड पडले होते. त्या ठिकाणी जाऊन श्री. पाटकर यांनी सहकाऱ्यांनी भेट दिली व पाण्याचा निचरा होण्यासाठी नगरपालिकेशी संपर्क करून पर्याय उपलब्ध करून दिला. याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मोरी घालण्यात आली आहे. त्यासाठी दीपक पाटकर यांनी पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे नंदू गवंडी यांच्या घराच्या बाजूला रस्त्यावर झाडाची फांदी पडली होती. ही फांदी हटवून मोठी वाहने जाण्यासाठी मार्ग खुला करून देण्यात आला.